वनाच्छादनात भारत पोहोचला ९व्या स्थानी; एफएक्यूचा अहवाल, वार्षिक वाढीत तिसरे स्थान कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:10 IST2025-10-23T09:09:50+5:302025-10-23T09:10:12+5:30
अर्ध्याहून अधिक वनक्षेत्र (५४ टक्के) फक्त पाच देशांमध्ये आहे.

वनाच्छादनात भारत पोहोचला ९व्या स्थानी; एफएक्यूचा अहवाल, वार्षिक वाढीत तिसरे स्थान कायम
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एकूण वनाच्छादनात भारत जागतिक स्तरावर नवव्या स्थानावर पोहोचला असून, वार्षिक वनक्षेत्र वाढीमध्येही तिसरे स्थान कायम राखले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएक्यू) नवीन अहवालात ही माहिती समोर आली.
एफएक्यूने बाली येथे जागतिक वन संसाधन मूल्यांकन (GFRA) २०२५ सुरू केले आहे. जगातील एकूण वनक्षेत्र ४.१४ अब्ज हेक्टर आहे, जे पृथ्वीच्या ३२ टक्के भूभाग व्यापते. अर्ध्याहून अधिक वनक्षेत्र (५४ टक्के) फक्त पाच देशांमध्ये आहे.
रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिका आणि चीन. ऑस्ट्रेलिया, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक आणि इंडोनेशियानंतर भारत जगातील पहिल्या १० वन-समृद्ध देशांमध्ये आहे. चीनने २०१५ ते २०२५ दरम्यान वनक्षेत्रात सर्वाधिक वार्षिक निव्वळ वाढ नोंदवली आहे, जी दरवर्षी १.६९ दशलक्ष हेक्टर आहे, त्यानंतर रशियन महासंघ ९४२,००० हेक्टर आणि भारताने १९१,००० हेक्टर यांचा क्रमांक लागतो.
मूल्यांकनात असे दिसून आले आहे की १९९० ते २०२५ दरम्यान वनक्षेत्रात वाढ नोंदवणारा आशिया हा एकमेव प्रदेश आहे, ज्यामध्ये चीन आणि भारताचा सर्वाधिक वाटा आहे. जागतिक जंगलतोड कमी करण्यात आशियातील वनक्षेत्राच्या विस्ताराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत सर्वाधिक जंगलतोड झाली आहे.
जंगलाचा विस्तार करणारे देश...
जंगलांचा विस्तार लक्षणीय असलेल्या इतर देशांमध्ये तुर्की (११८,००० हेक्टर), ऑस्ट्रेलिया (१०५,००० हेक्टर), फ्रान्स (९५,९०० हेक्टर), इंडोनेशिया (९४,१०० हेक्टर), दक्षिण आफ्रिका (८७,६०० हेक्टर), कॅनडा (८२,५०० हेक्टर) आणि व्हिएतनाम (७२,८०० हेक्टर) यांचा समावेश आहे.
वृक्षारोपण मोहिमेत वाढत्या लोकसहभागामुळे, विशेषतः 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत आणि राज्य सरकारांच्या मोठ्या प्रमाणात मोहिमांमुळे योगदान मिळाले. सर्व भारतीयांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. गेल्या वेळी आपण १० व्या स्थानावर होतो, त्या तुलनेत वनक्षेत्राच्या बाबतीत आपण जागतिक स्तरावर नववे स्थान मिळवले आहे. - भूपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण मंत्री.