पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 23:42 IST2025-05-16T23:41:40+5:302025-05-16T23:42:43+5:30

Operation Sindoor: केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानधून वाहणाऱ्या नदीचे पाणी मिळणेही पाकिस्तानला दुरापास्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण कसे?

india preparations for another set back to pakistan and likely stop water supply from kabul river afghanistan | पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एकामागून एक पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. यानंतर युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. भारताने यालाही चोख उत्तर दिले. या घडामोडींनंतरही सिंधू नदी जल वाटप करार स्थगितच राहणार असल्याचे भारताने स्पष्ट केले. परंतु, याचा मोठा परिणाम पाकवर होणार असल्याने या निर्णयावर पुनर्विचार करावा, यासाठी भारताला विनंती करण्यात आली आहे. यातच आता केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानमधून वाहणाऱ्या काबूल नदीचे पाणीही पाकिस्तानला मिळू शकणार नाही, असे सांगितले जात आहे. 

अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये अनेक मुद्द्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयशंकर आणि मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानात भारताच्या मदतीने सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना पुढे नेण्यास सहमती दर्शविली, ज्यामध्ये काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या लालंदरमधील शाहतूत धरण प्रकल्पाचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये याबाबत एक करार झाला होता. सत्ताबदलामुळे त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. परंतु, या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, असे समजते.

२० लाख लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल

काबूल नदीवर बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि परिसरात राहणाऱ्या सुमारे २० लाख लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. या धरण प्रकल्पासाठी भारत आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देणार आहे. सुमारे तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पात अफगाणिस्तानातील ४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. हा प्रकल्प पूर्णत्वास केल्यास पाकिस्तानसाठी आणखी कठीण परिस्थिती होईल, असे म्हटले जात आहे. कारण, या प्रकल्पामुळे काबूल नदीचे पाणी अडवले जाणार आहे. 

पाकचा अफगाणिस्तानशी कोणताही औपचारिक जल करार नाही

या प्रकल्पात काबूल नदीची भौगोलिक स्थिती पाकिस्तानसाठी अडचणीचे कारण आहे. ही नदी हिंदकुश पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवेश करते. हा प्रकल्प झाला की, पाकिस्तानला सर्वांत मोठा आणि थेट धोका पोहोचणार आहे. कारण खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणे पाकिस्तानला कठीण होणार आहे. काबूल नदी ही सिंधू नदीच्या खोऱ्याचा भाग आहे आणि पाकिस्तानसाठीही ती खूप महत्त्वाची आहे. अफगाणिस्तानशी कोणताही औपचारिक जल करार नसल्यामुळे पाकच्या चिंतेच भर पडू शकते, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. याबाबत त्यांचा मनापासून आभारी आहे. खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव असल्याच्या दाव्यांना त्यांनी ठामपणे नकार दिला. या गोष्टीचे स्वागत आहे. तसेच या चर्चेत अफगाणिस्तानातील जनतेसोबतची आपली पारंपारिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी सतत पाठिंबा देण्यावर भर दिला. दोन्ही देशांतील सहकार्य पुढे नेण्याबाबतही चर्चा झाली, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: india preparations for another set back to pakistan and likely stop water supply from kabul river afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.