हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:45 IST2025-05-09T13:44:43+5:302025-05-09T13:45:23+5:30
झोया आणि जैनला चांगले शिक्षण आणि आयुष्य मिळावे यासाठी ते आपले मूळ गाव कलानी चकथरूहून पुंछ शहरात आले होते.

हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
जम्मू - पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी रात्री ड्रोन, मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय एलओसीवर सातत्याने गोळीबार केला. पुंछ भागात पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारात २ निरागस बहीण आणि भाऊ यांचा जीव गेला. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या गोळीबारात १६ भारतीयांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानच्या गोळीबारात मारले गेलेले ही भावंडे एकाचवेळी जन्माला आली. एकत्रच वाढली आणि आता दोघांनी एकत्रच या जगाचा निरोप घेतला. ही भावंडे फक्त १२ वर्षांची होती. बुधवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. झोया आणि जैन असं या मृत भावंडांची नावे आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. झोया आणि जैनची आई अरुसा खान यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यांच्या जीवनात सगळीकडे अंधार पसरला आहे.
झोया आणि जैनला चांगले शिक्षण आणि आयुष्य मिळावे यासाठी ते आपले मूळ गाव कलानी चकथरूहून पुंछ शहरात आले. पण पाकच्या नापाक हेतूंमुळे त्यांच्या लाडक्या मुलांचा बळी गेला. भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्वाने एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. एका बाजूला अरुसा आपल्या मुलांना गमावल्याचे दु:ख सहन करत आहे आणि दुसऱ्या बाजूला पती रमीझ खान यांची वैद्यकीय महाविद्यालयात जगण्यासाठी झुंज सुरू आहे.
डॉक्टर, नर्सेसना तात्काळ कामावर येण्याचे आदेश
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पाहता जम्मू काश्मीर प्रशासनाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. जे आधीच रजेवर गेले आहेत त्यांना तसेच सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि अर्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही तत्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश दिलेत. खासगी नर्सिंग होम यांनाही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितले आहे.