भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 11:45 IST2025-05-10T11:43:38+5:302025-05-10T11:45:35+5:30

सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत.

India-Pakistan War: Operation Sindoor Colonel Sophia qureshi says Pakistan claims of destroying S-400 are false | भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

नवी दिल्ली - पाकिस्तानसोबत असलेल्या तणावात सलग चौथ्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हल्ल्याची आणि खोट्या दाव्याची माहिती दिली. पाकिस्तानने भारताच्या सैन्य स्थळावर हल्ल्याचा प्रयत्न केला तो भारतीय सैन्याने हाणून पाडला. एलओसीवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे. नागरी विमानांचा चुकीचा वापर पाकिस्तानी सैन्याकडून केला जात असल्याचं सोफिया कुरेशी यांनी म्हटलं. त्याशिवाय पाककडून सुरू असलेल्या खोट्या दाव्याचा बुरखाही पत्रकार परिषदेत फाडण्यात आला.

पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटलं की, पाकिस्तानी सैन्याने पश्चिमी सीमेवर हल्ले केले आहेत. भारतीय सैन्य तळांना टार्गेट करण्याचा पाकने प्रयत्न केला. एलओसीवर सातत्याने गोळीबार केला जात आहे. श्रीनगरपासून अनेक ठिकाणांवरून हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला त्याला भारतीय सैन्याने उत्तर दिले. उधमपूर, भटिंडासारख्या ठिकाणी उपकरणांना नुकसान पोहचवले. पंजाबच्या एअरपेसवर मिसाईड डागण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांना टार्गेट केले. भारतीय सैन्यानेही पाकचे हल्ले परतावून लावले. पाकिस्तान नागरी विमानांचा गैरवापर करत असल्याने भारतीय सैन्याने संयमाने प्रत्युत्तर दिले आहे असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत. कुपवाडा, बारामुला, पुंछ आणि अखनूर सेक्टरमध्ये तोफ, मोर्टार आणि सौम्य शस्त्राने भीषण गोळीबार केला जात आहे. भारतीय सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय एअरफोर्सला नुकसान पोहचवल्याचा पाकचा दावा खोटा आहे. सिरसा, सूरत एअरबेसचे व्हिडिओ, फोटो पत्रकार परिषदेत दाखवत इथे कोणतेही नुकसान नाही असं सांगण्यात आले. त्याशिवाय भारत धार्मिक स्थळांवर हल्ले करतेय, अफगाणिस्तानवरही मिसाईल फेकली यासारख्या अनेक खोट्या दाव्यांची पोलखोल कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावात जी७ देशाने प्रतिक्रिया देत दोन्ही देशातील तणाव कमी करण्याचा आग्रह धरला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. या दोन्ही देशात सातत्याने एकमेकांवर हल्ले होत आहेत. त्यात जी ७ सदस्य कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि युरोपीय संघाने दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधींशी तणाव कमी करण्याचं आवाहन केले आहे. दोन्ही देशातील नागरिकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे दोन्ही देशांनी तात्काळ तणाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं जी ७ देशांनी म्हटलं आहे.

Web Title: India-Pakistan War: Operation Sindoor Colonel Sophia qureshi says Pakistan claims of destroying S-400 are false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.