७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:15 IST2025-05-06T14:14:45+5:302025-05-06T14:15:13+5:30
हा अभ्यास खासकरून भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या संवेदनशील राज्यांमध्ये महत्त्वाचा असेल

७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहचला आहे. भारत कुठल्याही परिस्थिती आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. त्यातच केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी वॉर मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेत. देशभरात २४४ जिल्ह्यात ७ मे रोजी सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. ज्याचा मुख्य हेतू युद्धाच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन स्थितीला कसं सामोरे जायचे. विशेषत: हवाई हल्ले आणि अन्य हल्ल्यापासून वाचण्याची तयारी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या मॉक ड्रिलमधून प्राधान्याने सर्वसामान्यांना हवाई हल्ले आणि इतर हल्ल्याच्या वेळी शांतता पाळत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा, प्रशासनाने जारी केलेले निर्देश पाळायचे याची तयारी करून घेतली जाईल. हा अभ्यास खासकरून भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या संवेदनशील राज्यांमध्ये महत्त्वाचा असेल. हा मॉक ड्रिल गावपातळीपर्यंत आयोजित केला जाईल. ज्यात अग्निशमन सेवा, होम गार्ड, सिविल डिफेन्स संघटना सक्रीय असतील.
नागरिकांनी काय करायचे?
- मॉक ड्रिल काळात हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवले जातील. हा एक सराव आहे त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. सायरनचा आवाज ऐकून शांत राहा, गोंधळून जावू नका. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा
- सायरन वाजल्यानंतर लगेच खुल्या जागेवरून एखाद्या सुरक्षित इमारतीत, घरी, बंकरमध्ये आश्रय घ्या. जर तुम्ही बाहेर असाल तर नजीकच्या इमारतीत प्रवेश करा, सायरन वाजल्यानंतर लगेच ५-१० मिनिटांत सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या क्षेत्रात बंकर असतील तर तिथे जा.
- मॉक ड्रिलवेळी क्रॅश ब्लॅकआऊटचा सराव होईल. ज्यात सर्व लाईट्स बंद करण्यात येतील. जेणेकरून शत्रूला टार्गेट मिळणे कठीण होईल. आपल्या घराच्या खिडक्या, दरवाजे यावर काळे कपडे अथवा एखाद्या वस्तूने झाकून ठेवा. घरातील उजेड बाहेर जाता कामा नये. रस्त्यावर वाहन चालवताना ते बाजूला घ्या, लाईट बंद करा.
- मॉक ड्रिलमध्ये नागरिक आणि विद्यार्थ्यांना सिविल डिफेन्सचं प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरुन हल्ल्यावेळी स्वत:ला कसं वाचवायचे हे शिकवले जाईल. प्रशिक्षणात सहभाग घ्या, आपात्कालीन स्थितीत काय करायचे हे माहिती करून द्या. बंकरमध्ये लपण्याची जागा, प्राथमिक आरोग्य सुविधा, सुरक्षित राहण्याची योजना याचा सराव घेतला जाईल.
- मॉक ड्रिलमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी नेले जाईल. प्रशासनाच्या सूचना पाळा, गोंधळ करू नका. कुटुंबासह आपला जीव वाचेल याकडे लक्ष द्या. बाहेरचा मार्ग आणि सुरक्षित ठिकाणांची माहिती करून घ्यावी.
- टीव्ही, रेडिओ यावर सरकारी अलर्टची माहिती घ्या. मॉक ड्रिलच्या काळात प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना प्रसारित केल्या जातील. अफवांपासून सावध राहा, केवळ अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवा.
- मॉक ड्रिलमध्ये आपत्कालीन किटचा वापर समजवला जाऊ शकतो. त्यात पाणी, भोजन, प्राथमिक आरोग्य सुविधा, टॉर्च बॅटरी, महत्त्वाची कागदपत्रे, अतिरिक्त कपडे, चादर यांचा समावेश आहे. हे किट सहज उपलब्ध होईल असं नियोजन करा.
- स्थानिक प्रशासन, सिविल डिफेन्स सदस्य, पोलिस यांना सहकार्य करा. जर तुम्ही सिविल डिफेन्स अथवा होमगार्डशी जोडले असाल तर तुमची जबाबदारी ओळखा आणि दुसऱ्यांना मदत करा. शेजारी, समाजासोबत मिळून काम करा जेणेकरून सर्व सुरक्षित राहतील.
- लहान मुलांना ड्रिलबाबत समजावा, त्यांना भीती वाटणार नाही याची काळजी घ्या. सायरन, ब्लॅकआऊट प्रक्रियेची माहिती द्या. वृ्द्ध आणि गरजू व्यक्तींची मदत करा, त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी मदत करा.
- सोशल मीडियावरील कुठल्याही अफवांना खरे मानू नका. चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, केवळ सरकारकडून आलेली अधिकृत माहिती आणि सूचनांचे पालन करा.