इंफाल - भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरही भारताकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. भारतीय अंतराळ संस्था(ISRO) ने देशाच्या सुरक्षेसाठी १० सॅटेलाईट सतत काम करत आहेत. हे सॅटेलाईट २४ तास अवकाशातून सीमेवर लक्ष ठेवणार आहेत असं विधान इस्त्रोचे चेअरमन वी. नारायण यांनी केले. एग्रीकल्चरल यूनिवर्सिटीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. इंफालमध्ये हा कार्यक्रम झाला. पाकिस्तानशी सुरू असलेल्या तणावात देशाच्या सुरक्षेसाठी इस्त्रो वैज्ञानिक सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर आता नवीन सॅटेलाईट कायम करडी नजर ठेवून असणार आहेत.
ISRO प्रमुख म्हणाले की, देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कमीत कमी १० सॅटेलाईट सातत्याने काम करत आहेत. तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबाबत जाणता, जर आपल्याला देशाच्या सुरक्षेची काळजी घ्यायची असेल तर सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला सेवा करावी लागणार आहे. आम्ही आपल्या ७००० किमी सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहोत. उत्तरेकडेही सातत्याने लक्ष दिले जात आहे. सॅटेलाईट आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे करू शकत नाही. भारताची सीमा आता आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. येत्या १८ मे रोजी इस्त्रो नवीन सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. त्याचे नाव RISAT-1B असं आहे. त्याला EOS-09 नावानेही ओळखलं जाणार आहे. श्रीहरिकोटा येथून स्पेस सेंटरहून ते लॉन्च होईल.
RISAT-1B सॅटेलाईटमध्ये काय आहे खास?
RISAT-1B ही एक खास रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे जी प्रत्येक वातावरणात काम करू शकते. पाऊस असो धुक्याची चादर किंवा रात्र, या सॅटेलाईटमधून पृथ्वीवरचे फोटो घेता येऊ शकतात. त्यात C-ब्रँड सिंथेटिक एपर्चर रडार लावण्यात आलीय. ही रडार खूप चांगल्या क्वालिटीचे फोटो घेते. नेहमी जे कॅमेरेवाले सॅटेलाईट असतात ते खराब हवामानात अथवा रात्री चांगले फोटो घेत नाहीत परंतु RISAT-1B प्रत्येक परिस्थितीत काम करते. ही सॅटलाईट भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणार आहे. विशेषत: ऑपरेशन सिंदूरनंतर ती गरजेची आहे. त्यातून भारतीय सैन्याला पाकिस्तान, चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यास मदत मिळणार आहे. देशाच्या सागरी सीमेची सुरक्षाही होईल. हे सॅटलाईट घुसखोरी रोखेल आणि दहशतवाद विरोधी अभियानात फायदेशीर ठरेल.
दरम्यान, RISAT-1B दहशतवाद्यांना पकडण्यास मदत करेल. जर दहशतवादी सीमेतून घुसखोरी करत असतील तर त्यांच्या हालचाली सहजपणे टीपेल. या सॅटेलाईटमध्ये ५ वेगवेगळ्या इमेजिंग मोड आहेत. एक मोडमध्ये खूप लहान गोष्टीचाही फोटो घेता येऊ शकतो. दुसऱ्या मोडमध्ये मोठ्या परिसराचा फोटो घेता येईल. या सॅटेलाईटचा मिलिट्रीसोबतच सर्वसामान्यांसाठीही उपयोग होईल. ज्यात शेती, जंगल, माती परिक्षण, भूविज्ञान, पूर यावरही नजर ठेवता येईल.