३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST2025-05-14T16:29:03+5:302025-05-14T16:29:42+5:30
India Pakistan Conflict: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे.

३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी
ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला संघर्ष युद्धविरामानंतर थांबला आहे. त्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये सुमारे तीन दिवस चाललेल्या संघर्षादरम्यानची एक एक कहाणी समोर येत आहे. भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरअंतर्गत सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने नागरी वस्त्या आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्याने भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यादरम्यान, भारतीय नौदलही अरबी समुद्रामध्ये मोठ्या ताफ्यासह कराचीला लक्ष्य करण्यासाठी सज्ज होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
भारतीय सैन्यदलांनी दहशतवाद्यांना लक्ष्य करत राबवेल्या या मोहिमेदरम्यान, भारतीय नौदलाने कराचीजवळील अरबी समुद्रात ३६ युद्धनौकांची तैनाती केली होती. त्यात विमानवाहू नौका विक्रांतसह ७ फ्रिगेट, ७ पाणबुड्या आणि विनाशिकांचा समावेश होता. या तैनातीमधून भारतीय नौदलाने आपल्या आरमारी शक्तीचं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. तसेच पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं.
एप्रिल महिन्यात २२ तारखेला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार भारताच्या सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर या मोहिमेंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भीषण हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारताच्या तिन्ही सेनादलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तानला जेरीस आणले होते.
पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आणि कुठल्याही हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल याची जाणीव पाकिस्तानला करून देणे हा ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी भारताने कराचीजवळ अरबी समुद्रामध्ये युद्धनौकांची जबरदस्त तैनाती केली होती. या तैनातीमुळे अखेरीस पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती.