Imran Masood on India Pakistan Ceasefire: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर तीव्र हल्लेदेखील केले. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्तीने शनिवारी(10 मे) शस्त्रसंधी घोषित करण्यात आला. पण, आता यावरुनच विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.
काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्यकाँग्रेस खासदार इम्रान मसूद भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. नेमके काय घडत आहे, ते आम्हाला समजत नाहीय. भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवले आणि शत्रूच्या घरात घुसून त्याला धूळ चारायला लावली. पण, त्यानंतर अचानक तिसऱ्या देशाने बाहेरुन शस्त्रसंधी लागू केल्याची घोषणा केली आणि आपणही ते स्वीकारले. हे समजण्यापलीकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन काय घडत आहे, ते सांगावे," अशी मागणी त्यांनी केली.
काश्मीर आमचा होता आणि राहील...
ते पुढे म्हणतात, "पाकिस्तान हा एक धूर्त देश आहे. तो कधीही सत्य सांगणार नाही. एकीकडे शस्त्रसंधी जाहीर केली जातो, तर दुसरीकडे पाकिस्तान त्याचे उल्लंघन करतो. दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे, यासाठी संपूर्ण देश आज एकजुटीने उभा आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, काश्मीरचा प्रश्न मध्यस्थीने सोडवला जाईल. काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहील. मला वाटत नाही की कोणताही भारतीय काश्मीरवर तडजोड करण्याचा विचारही करू शकेल. म्हणून, आमची मागणी अशी आहे की पंतप्रधानांनी पुढे येऊन काय घडत आहे ते सांगावे," असेही ते म्हणाले.