ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:34 IST2025-07-08T11:33:53+5:302025-07-08T11:34:11+5:30
India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते.

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा
ऑपरेशन सिंदूरवेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. राफेल पाडल्याची अफवेमागे चीन असल्याचा दावा नुकताच फ्रान्सने केला होता. आता फ्रान्सच्याच हवाई दल प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय हवाई दलाने एक राफेल विमान गमावल्याचा दावा केला आहे.
सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. भारताने यावर जास्त माहिती न देता लढाईमध्ये असे नुकसान होत असते, आपले सर्व पायलट सुखरूप माघारी आले असल्याचे म्हटले होते. यामुळे या दाव्याबाबत संदिग्धता होती. त्यावरून आता पडदा हटू लागला आहे.
फ्रान्स हवाई दलाच्या प्रमुखांनी आता भारताला एका राफेल लढाऊ विमानाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आम्ही ८ देशांना राफेल लढाऊ विमाने विकली आहेत. परंतू, युद्धावेळी गमावलेले हे पहिले विमान असल्याचे ते म्हणाले. जेरोम बेलंगर यांनी हा दावा केला आहे. फ्रान्सच्या टॉपच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानने राफेल पाडले की पडले याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, राफेल विमाने बनविणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने देखील भारताचे राफेल पडल्याचे म्हटले आहे. डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांच्या हवाल्याने एका फ्रेंच वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. भारताने त्यांचे एक राफेल लढाऊ विमान गमावले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. परंतू हे विमान शत्रूच्या माऱ्यामुळे नाही तर उंचावर तांत्रिक बिघाडामुळे पडल्याचे ट्रॅपियर यांनी म्हटले आहे. एव्हियन डी चासे या फ्रेंच वेबसाइटवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ही घटना विस्तारित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान १२,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर घडली, या घटनेमध्ये शत्रूचा सहभाग नव्हता किंवा शत्रूचा रडार संपर्क झाला नव्हता, असे यात म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानचा दावा नाकारलाही नव्हता, अन्...
संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी काही दिवसांपूर्वीच लढाऊ कारवायांमध्ये अपरिहार्य नुकसान होते, असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी राफेल किंवा इतर विमानांचा समावेश आहे की नाही याची पुष्टी केली नाही. परंतू, जेव्हा पाकिस्तान दावा करू लागला होता तेव्हा भारतीय सैन्य दलांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी आपले सर्व पायलट सुखरूप परत आल्याचे म्हटले होते.