गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:28 IST2025-11-12T12:27:43+5:302025-11-12T12:28:40+5:30
India Israel Missile Deal: भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण संबंधांनी आता एक नवा टप्पा गाठला आहे. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण करारानुसार, इस्रायल लवकरच भारताला दोन अत्यंत शक्तिशाली क्षेपणास्त्रे पुरवणार आहे.

गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
भारताचा रशियानंतर सर्वात विश्वासू मित्र जर कोण असेल तर तो इस्रायल आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. संकटकाळात भारतानेइस्रायलला आणि इस्रायलने भारताला संरक्षण क्षेत्र असेल, टेक्नॉलॉजी असेल किंवा अन्य गोष्टींत वेळोवेळी मदत केली आहे. पाकिस्तान अण्वस्त्रांची पहिल्यांदा चाचणी करणार होता तेव्हा इस्रायलच भारतासाठी पाकिस्तानवर हवाई हल्ले करणार होता. आज या मैत्रीचा नवा अध्याय सुरु झाला आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण संबंधांनी आता एक नवा टप्पा गाठला आहे. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण करारानुसार, इस्रायल लवकरच भारताला दोन अत्यंत शक्तिशाली क्षेपणास्त्रे पुरवणार आहे. विशेष म्हणजे, या क्षेपणास्त्रांचे उत्पादन भारतातच केले जाणार आहे, ज्यामुळे 'मेक इन इंडिया' उपक्रमाला बळ मिळणार आहे.
या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मागील आठवड्यात इस्रायलचा गुप्त दौरा केला होता, जिथे दोन्ही देशांच्या संरक्षण सचिवांनी एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब केले.
काय आहे करारामध्ये?
एअर लोरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे: ही इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजची प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत.
आईस ब्रेकर क्रूझ क्षेपणास्त्रे: राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्सने विकसित केलेली ही क्षेपणास्त्रे सुमारे 300 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतात. ही क्रूझ मिसाईल जमीन आणि समुद्रातील लक्ष्यांवर अचूक मारा करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या परिस्थितीतही प्रभावीपणे काम करण्यासाठी ओळखली जातात, ज्यामुळे भारतीय नौदल आणि वायुदलाची क्षमता वाढणार आहे.
इस्रायलचा सर्वात मोठा ग्राहक भारत
संरक्षण क्षेत्रात भारत हा इस्रायलचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. एका अहवालानुसार, 2020 ते 2024 या काळात इस्रायलच्या एकूण संरक्षण विक्रीपैकी सुमारे 34 टक्के हिस्सा एकट्या भारताने खरेदी केला आहे. हा नवा करार दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे भारतात हस्तांतरण दर्शवतो.