"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:29 IST2025-11-17T13:28:44+5:302025-11-17T13:29:39+5:30
"भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक (Nuclear) ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही आणि युद्ध चार महिने चालो अथवा चार वर्षे, भारतीय सेन्य कोणत्याही स्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे."

"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
देशाचे सर्वोच्च लष्करी कमांडर आणि रणनीतिक तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'चाणक्य डिफेन्स डायलॉग' पूर्वी, लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. भारत कोणत्याही परिस्थितीत, कितीही मोठी आणि दीर्घ लढाई लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे द्विवेदी यांनी म्हटले आहे.
जनरल द्विवेदी यांनी, पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा देत, शत्रु कुणीही असो, भारतीय सेन्य कुठल्याही धोक्याला जशास-तसे उत्तर देण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, पाकिस्तान पडद्याआडून दहशतवादाला कितीही खत-पाणी घालत असला तरी, भारतीय सेन्याचे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष आहे, असेही द्विवेदी म्हणाले.
जम्मू-काश्मीर संदर्भात बोलताना द्विवेदी म्हणाले, "जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत असून, गेल्या पाच वर्षांत दहशतवादात मोठी घट झाली आहे. मारले गेलेले 61% दहशतवादी पाकिस्तानी आहेत. यावरून सिद्ध होते की, सीमेपलीकडून दहशतवादी पाठविण्याचे काम अजूनही सुरूच आहे. मात्र, काश्मीरातील तरुण आता भारतासह त्यांचे भविष्य बघत आहेत."
'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत जनरल द्विवेदी म्हणाले, "हे केवळ एक ट्रेलर होते. गरज पडल्यास पाकिस्तानला 'जबाबदार देश आपल्या शेजारील देशाशी कशा पद्धतीने वागत असतो'? हे शिकवले जाईल. भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक (Nuclear) ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही आणि युद्ध चार महिने चालो अथवा चार वर्षे, भारतीय सेन्य कोणत्याही स्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे."
चीनसोबतच्या संबंधांवर बोलताना द्विवेदी यांनी आशा व्यक्त केली की, "पूर्व लडाखमध्ये तणाव कमी झाल्यानंतर दोन्ही देश आता सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहेत. राजकीय नेतृत्वादरम्यान चर्चा वाढल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. डिप्लोमसी आणि राजकीय दिशा जेव्हा सोबत काम करते, तेव्हा डिफेंस डिप्लोमसी एक स्मार्ट पॉवर बनत असते.”