सिंधु पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होऊ शकते. याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये २० टक्क्यांहून अधिक पाण्याची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काही कठोर पावलं उचलली आहेत. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, आयआरएसए म्हणजेच सिंधु नदी प्रणाली प्राधिकरणाच्या सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये २१ टक्के पाण्याची कमतरता भासण्याचा अंदाज वर्तवला आहे. चिनाब नदीतील पाण्याची घट हे या मागचे मोठे कारण आहे.भारताने चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणांचे दरवाजे बंद केले आहेत, ज्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली असून, पाकिस्तानमधील पाण्याच्या प्रवाहवर याचा परिणाम झाला आहे.
आता केंद्र सरकार किशनगंगा धरणावर पाकिस्तानविरुद्ध अशीच कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात आयआरएसएच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीतील खरीप हंगामाच्या तयारीबाबत चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, आयआरएसएने म्हटले की, 'सिंधु नदी सल्लागार समितीने खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या आणि खरीप हंगामाच्या अखेरच्या महिन्यांसाठी पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. भारताने पाणी पुरवठा थांबवल्यानंतर चिनाब नदीचा प्रवाह अचानक कमी झाल्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.'
सध्या या परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, चिनाबमधील पाण्याचा प्रवाह आणखी कमी झाला तर २१ टक्क्यांहून अधिक पाणी टंचाई भासू शकते. तर, बागलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे बंद झाल्याने ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे समितीने म्हटले आहे.