CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 12:01 IST2021-12-05T11:57:48+5:302021-12-05T12:01:32+5:30
CoronaVirus News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पाच रुग्ण आढळले; चार राज्यांत रुग्णांची नोंद

CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका वाढला असताना मोठा दिलासा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली पॉझिटिव्ह बातमी
नवी दिल्ली: ओमायक्रॉनचा धोका दिवसागणिक वाढत आहे. आफ्रिकेत सर्वप्रथम आढळून आलेल्या ओमायक्रॉननं आतापर्यंत तीन डझनहून अधिक देशांमध्ये शिरकाव केला आहे. गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आजपर्यंत हा आकडा पाचवर पोहोचला आहे. कर्नाटकात २, तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत प्रत्येकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.
भारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मंडाविया यांनी दिली. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. 'लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे,' असं मंडाविया म्हणाले. गेल्या २४ तासांत १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत.
"It is a moment of great pride as over 50% of the eligible population are now fully vaccinated," says Union Health Minister Dr Mansukh Mandaviya
— ANI (@ANI) December 5, 2021
Total vaccinations stand at 1,27,61,83,065, as per the Health Ministry pic.twitter.com/KrxUlsMtzr
शनिवारी देशात १ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. 'हर घर दस्तक अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे,' असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण अभियान सुरू झालं. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर साठी ओलांडलेल्यांच्या लसीकरणास सुरवात झाली. यानंतर ४५ वर्षे पूर्ण केलेल्या लोकांचं लसीकरण सुरू झालं.
देशात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण
गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन दोन रुग्ण आढळून आले. त्यानंतर शनिवारी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉनचा प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. तर आज सकाळी दिल्लीत एका रुग्णाची नोंद झाली. हा व्यक्ती टांझानियाहून आला आहे.