पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:10 IST2025-10-25T16:09:35+5:302025-10-25T16:10:20+5:30
विशेष म्हणजे या युद्ध सरावात आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचीही क्षमता तपासली जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्येही स्वदेशी शस्त्रांनी शत्रूला घाम फोडला होता.

पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
नवी दिल्ली - पाकिस्तान आणि पाक सैन्यावर १२ दिवस खूप भारी पडणार आहेत. भारताच्या तिन्ही सैन्य दलाकडून येत्या ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात पश्चिम सीमेवर संयुक्त युद्ध सराव करण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा सराव असेल. ज्याप्रकारे अलीकडेच सर क्रीक परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या ना पाक हरकती समोर आल्या आहेत, ते पाहता तिन्ही सैन्य दलाच्या या युद्ध अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूसेना यांच्या संयुक्त ऑपरेशनला त्रिशूल युद्ध अभ्यास नाव देण्यात आले आहे.
भारताने जारी केले NOTAM
भारताने त्रिशूल युद्ध अभ्यासासाठी नोटीस टू एअरमेन(NOTAM)जारी केले आहे. NOTAM मध्ये म्हटले आहे की, तिन्ही सैन्य एक मोठा सराव करणार आहेत. ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर काळात पश्चिम सीमेवर होणाऱ्या 'त्रिशूल' सरावात तिन्ही सैन्य सहभागी होतील. या 'त्रिशूल' सरावाद्वारे तिन्ही सैन्य भारताच्या वाढत्या संयुक्ततेसह आत्मनिर्भर आणि इनोवेशनचे प्रदर्शन करतील, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशस्त्र दलांसाठी 'जय' (JAI - Jointness, Aatmanirbharta,Innovation) दृष्टिकोनाचे आधारस्तंभ आहेत असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
तिन्ही सैन्याचा 'त्रिशूल' अभ्यास
'त्रिशूल' सरावात दक्षिण कमांडचे सैन्य महत्त्वाची भूमिका बजावेल. ते आव्हानात्मक कच्छ खाडी प्रदेश आणि पश्चिम सीमेवरील वाळवंटातील प्रदेशासह विविध ठिकाणी संयुक्त ऑपरेशन्स करतील. शिवाय भारतीय सैन्य सौराष्ट्र किनाऱ्यावरील समुद्रातदेखील ऑपरेशन्स करतील. या सरावादरम्यान गुप्तचर, पाळत ठेवणे आणि देखरेख ठेवणे याचाही सराव घेतला जाईल. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सायबर युद्धाच्या आव्हानांशी संबंधित सराव देखील आयोजित केले जातील. विशेष म्हणजे या युद्ध सरावात आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचीही क्षमता तपासली जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्येही स्वदेशी शस्त्रांनी शत्रूला घाम फोडला होता.
दरम्यान, सॅटेलाइट इमेजरी एनालिस्ट डेमियन सायमन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये भारताने पश्चिम सीमेसाठी जारी केलेला NOTAM इशारा दाखवला आहे. त्यांनी हा युद्ध सराव असामान्य असल्याचं म्हटलं आहे. कारण २८,००० फूट उंचीपर्यंतच्या जागा युद्धाभ्यासांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जे अलिकडच्या काळात झालेल्या महत्त्वपूर्ण संयुक्त युद्धाभ्यासाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ सशस्त्र दल आकाशातून शत्रूंना तोंड देण्यासाठी देखील सज्ज असतील हे स्पष्ट आहे.
India has issued a notification for a Tri-Services Exercise along its western border with Pakistan, the chosen area & scale of activity are unusual
— Damien Symon (@detresfa_) October 24, 2025
Date | 30 October- 10 November 2025 pic.twitter.com/IsDdLs0x0k