बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:42 IST2025-08-15T09:18:09+5:302025-08-15T09:42:19+5:30
वाचाळगिरी करणाऱ्या पाकला भारताचा इशारा

बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा
नवी दिल्ली :पाकिस्तानने कोणत्याही केल्यास त्या प्रकारची चूक देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ व माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित करीत भारताला धमक्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पाकला लक्ष्य केले.
पाकिस्तानी नेतृत्वाकडून भारताविरुद्ध बेजबाबदार, युद्धाला चालना देणारे व द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्याचे नमूद करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकला लक्ष्य केले. आपले अपयश लपविण्यासाठी वारंवार भारताविरोधात विधाने करणे ही तुमच्या नेतृत्वाची जुनी खोड आहे. त्यामुळे पाक नेत्यांनी यापुढे भारताविरोधात कोणतेही वक्तव्य करताना संयम बाळगावा. तसे केले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे नमूद करत जैस्वाल यांनी पाक नेतृत्वाला ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली.
यापूर्वी लष्कर प्रमुख मुनीर यांनी, भारताने सिंधू नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तान १० क्षेपणास्त्रांनी उडवून देईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पाकचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारताला डिवचले होते.