'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:49 IST2025-07-09T10:49:17+5:302025-07-09T10:49:38+5:30
'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
पहलगामवरील क्रूर हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' पुकारले. यावेळी, भारतीय शूरवीरांनी केवळ शत्रूचा खात्मा केला नाही, तर एका अशा चालीने पाकिस्तानला धडकी भरवली की, त्यांनी स्वतःच आपल्या पराक्रमाचे ढोल बडवत भारताचे राफेल विमान पाडल्याचा खोटा दावा केला. मात्र, सत्य तर राफेलच्या अदृश्य 'X-Guard डिकॉय सिस्टिम'मध्ये दडले होते, ज्याने पाकिस्तानच्या सर्व अत्याधुनिक रडार आणि मिसाइल यंत्रणांना अक्षरशः वेड लावले.
राफेलचे X-Guard सिस्टम कसे काम करते?
X-Guard हे एक फायबर ऑप्टिक टो डिकॉय आहे, जे राफेलच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमचा एक भाग आहे. याचे मुख्य काम शत्रूच्या रडार-गाईडेड मिसाइल्स आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांना दिशाभूल करणे हे आहे. हे डिकॉय शत्रूच्या रडारला राफेलचे खोटे लोकेशन देते आणि डॉपलर सिग्नल्सची तंतोतंत नक्कल करते.
हे फक्त २ सेकंदात सक्रिय होते आणि ३६० अंशांमध्ये ५००-वॉटचे जॅमिंग सिग्नल पाठवते. याची खासियत अशी आहे की, यामुळे शत्रूला असे वाटते की, त्यांनी खऱ्या राफेलला लक्ष्य केले आहे, पण प्रत्यक्षात ते डिकॉय असते.
भारताने पाकिस्तानला कसा दिला चकमा?
माजी अमेरिकन फायटर पायलट रायन बोडेनहाइमर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, हे मिशन आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर डिकॉयिंग रणनीती होती. भारताने X-Guardच्या मदतीने पाकिस्तानचे 'जे-१० सी' फायटर जेट आणि 'पीएल १५ सी' मिसाइल्सला पूर्णपणे गोंधळात टाकले. पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या 'KLJ-7A AESA' रडारला हे ओळखता आले नाही की, त्यांनी खऱ्या विमानाला नाही, तर डिकॉयला लक्ष्य केले आहे. यामुळे पाकिस्तानने दावा केला की, त्यांनी एक भारतीय राफेल पाडले आहे, तर प्रत्यक्षात ते X-Guard होते.
डसॉल्ट आणि संरक्षण सचिवांचे काय म्हणणे आहे?
डसॉल्ट एव्हिएशनचे चेअरमन एरिक ट्रॅपियर यांनी एका संरक्षण वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले की, भारताने एक राफेल विमान गमावले, परंतु याचे कारण तांत्रिक बिघाड होते. त्यावर शत्रूची कोणतीही कारवाई झालेली नाही. हे विमान १२००० मीटर उंचीवर एका लांब प्रशिक्षण मिशन दरम्यान क्रॅश झाले.
त्याच वेळी, भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा खोटा आहे आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये भारताच्या तंत्रज्ञानाने शत्रूला पूर्णपणे चकमा दिला.
चीनचा प्रॉपगंडा
फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने आपल्या राजनैतिक नेटवर्कचा वापर करून राफेलची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. राफेलची कामगिरी कमकुवत आहे, असे जगभरात चित्र निर्माण करण्याचा त्यांचा कुटिल डाव होता. मात्र, 'ऑपरेशन सिंदूर'ने हे सिद्ध केले की, राफेल आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारताची युद्धनीती आजच्या युगात सर्वात प्रगत आणि अजिंक्य आहे. या एका ऑपरेशनने जगाला दाखवून दिले की, भारताच्या ताकदीला कमी लेखणे शत्रूंना किती महागात पडू शकते.