कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 14:45 IST2019-04-15T14:43:17+5:302019-04-15T14:45:44+5:30
देशातील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव

कसा होणार भारत 'आयुष्यमान'?; देशात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सेसची कमतरता
वॉशिंग्टन: भारतात 6 लाख डॉक्टर आणि 20 लाख नर्सेसची कमतरता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याशिवाय योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. सरकारनं आरोग्य क्षेत्रासाठी केलेली कमी तरतूद, न परवडणारी औषधं यामुळे भारतातील गरिबी वाढते, असं सेंटर फॉर डिजीज डायनामिक इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या अमेरिकन संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
भारतातील 65 टक्के आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत. आरोग्य सेवांचा खर्च जास्त असल्यानं दरवर्षी 5 कोटी 70 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जातात, अशी आकडेवारी सीडीडीईपीच्या अहवालात आहे. जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू औषधांअभावी मृत्यू होतो. यातील बहुतांश मृत्यू हे मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. सीडीडीईपीच्या संशोधकांनी युगांडा, भारत, जर्मनीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन या संदर्भातला अहवाल तयार केला.
मध्यम आणि अल्प उत्पन्न गटात येणाऱ्या देशातील आरोग्य सुविधा दुय्यम दर्जाच्या असल्याची बाब सीडीडीईपीच्या संशोधकांच्या लक्षात आली. याशिवाय या देशांमधील आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्ग फारसा प्रशिक्षित नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. भारतात डॉक्टरांचं प्रमाण अतिशय कमी आहे. देशात दर 10,189 व्यक्तींमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दर 1000 व्यक्तींमागे 1 डॉक्टर उपलब्ध असायला हवा. मात्र भारतात तब्बल 6 लाख डॉक्टरांची कमतरता आहे. याशिवाय दर 483 व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध आहे. ही आकडेवारी लक्षात घेता भारतात 20 लाख नर्सेसची कमतरता आहे.