“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 23:38 IST2025-05-13T23:35:24+5:302025-05-13T23:38:35+5:30
India Vs Pakistan Conflict: केंद्र सरकारने यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे.

“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
India Vs Pakistan Conflict: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तानकडून केले जाणारे अनेक दावे फसवे आणि खोटे निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भारताची भूमिका स्पष्टपणे जगासमोर मांडली. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असले, तरी दोन्ही देशांत अद्यापही तणावाची स्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. यातच भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर थेट कारवाई करत, २४ तासांत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा म्हणजेच अवांछित व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. त्या अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे प्रतिबंधित अथवा अनिष्ट व्यक्ती. केंद्र सरकारने यासंदर्भात पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
भारतातील पाकिस्तानी अधिकारी विविध अवैध कृत्यांमध्ये गुंतले असल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने भारतातील त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱ्या कृत्यांमध्ये भाग घेतल्याने त्याला २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कृत्याच्या स्वरूपाबद्दल अधिक माहिती उघड करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पर्सोना नॉन ग्राटा हा एक लॅटिन शब्द असून अवांछित व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. एखाद्या देशात कार्यरत असलेल्या परदेशी मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा थेट राजकीय निषेध नोंदवण्यासाठी वापर केला जातो. या निषेधासाठी अशा प्रकारची कारवाई केली जाते. त्यानुसार सदर अधिकाऱ्याला काही तास अथवा काही दिवसांमध्ये देश सोडून जाण्यास सांगितले जाते. अन्यथा त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाते.