भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 06:36 IST2025-05-26T06:01:18+5:302025-05-26T06:36:08+5:30
‘आयएमएफ’चा अहवाल : भारत आता चाैथी मोठी अर्थव्यवस्था, जीडीपी ४.१८७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत

भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
नवी दिल्ली : नीती आयोगाच्या १०व्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या टिप्पणीमुळे सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे. सुब्रह्मण्यम म्हणाले की, आपण जगात चौथी सर्वात मोठी ४ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहोत. हा माझा डेटा नाही, ‘आयएमएफ’ने हे सांगितले आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी यांच्या अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठ्या आहे.
‘आयएमएफ’च्या एप्रिल २०२५च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक रिपोर्टनुसार, भारताचा जीडीपी ४.१८७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे, जो जपानच्या अंदाजित जीडीपी ४.१८६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे.
जागतिक पातळीवर कोणते लाभ होणार?
प्रभावात वाढ : भारताचा प्रभाव जी-२० आणि ‘आयएमएफ’सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर वाढेल.
गुंतवणुकीचे केंद्र : भारतात
थेट परकीय गुंतवणूक वाढेल. जागतिक कंपन्या भारताला एक आकर्षक बाजार म्हणून पाहत आहेत.
प्रादेशिक स्थैर्य : भारत व जपान यांच्यातील मजबूत रणनीतिक भागीदारी, लष्करी सहकार्य यामुळे आशियामध्ये स्थैर्य मिळू शकेल.
आर्थिक नेतृत्व : भारत जागतिक आर्थिक नेतृत्वाच्या म्हणून पुुढे आला आहे. २०२८ पर्यंत जर्मनीला मागे टाकले तर या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल.
सुब्रह्मण्यम म्हणाले की, भारत अशा टप्प्यावर आहे, जिथे तो खूप वेगाने विकास करू शकतो. भारताला २० ते २५ वर्षांत जादा लोकसंख्येचा लाभ मिळेल.आपण वेगाने विकास करू शकतो. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना त्यांच्या स्तरावर व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन केले आहे.
जपान मागे का पडला? : २०२५ मध्ये जपानच्या जीडीपी वाढीचा दर ०.३ टक्के राहील, जो भारताच्या ६.५ टक्केच्या तुलनेत खूपच कमी आहे. वृद्धांची संख्या अधिक असल्याने कुशल मनुष्यबळाची वानवा आहे.
तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
रोजगाराच्या संधी : वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे नवीन रोजगार निर्माण होतील. विशेषतः तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात युवकांना नोकऱ्या मिळतील.
जीवनमान उंचावेल : वाढता जीडीपी आणि गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा होईल.
ग्राहकशक्ती वाढणार : वाढते उत्पन्न आणि मध्यमवर्गाच्या विस्तारामुळे उपभोग्य वस्तू व सेवांची मागणी वाढेल.
१० सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था
अमेरिका ३०.५०७
चीन १९.२३१
जर्मनी ४.७४४
भारत ४.१८७
जपान ४.१८६
इंग्लंड ३.८३९
फ्रान्स ३.२११
इटली २.४२२
कॅनडा २.२२५
ब्राझील २.१२५