India China FaceOff: China again played a cunning trick, advised India to withdraw from Pangong Tso | India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला

India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला

ठळक मुद्देभारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायमचीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे

नवी दिल्ली - लडाखमध्ये घुसखोरीच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव कायम आहे. एकीकडे दोन्ही देशामधील वातावरण शांत असले तरी चीनकडून सातत्याने नवनव्या चाली खेळल्या जात आहेत. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली. या बैठकीमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारीबाबत चकार शब्द न काढता भारतालाच पँगाँग त्सो येथून माघार घेण्यास सांगितले, दरम्यान, भारताने चीनचा हा प्रस्ताव स्पष्टपणे धुडकावून लावला आहे.

भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायम आहे. चीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले आहे. मात्र भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.

पँगाँग त्सो परिसरात फिंगर ४ च्या अलीकडे भारताच्या नियंत्रणाखालील भाग आहे. मात्र मे महिन्यामध्ये चिनी सैन्य हे फिंगर चार पर्यंत आले होते. दरम्यान, चर्चेनंतर चिनी सैन्य फिंगर पाच पर्यंत माघारी गेले. पण चिनी सैन्य भारतीय लष्कराला फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्यास मनाई करत आहे.

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील गटाने या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यानंतर हॉटलाइनवरून हा प्रस्ताव फेटाळत असल्याचे चीनला सांगण्यात आले.

रविवारी झालेल्या चर्चेतही चीनने पँगाँस त्सोमधून माघार घेण्यास नकार दिला होता. तर भारताने एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने माघार घेण्याची आणि एप्रिलमध्ये एलएसीवर असलेली यथास्थिती कायम करण्याची अट घातली होती. दरम्यान, हॉट स्प्रिंगमधील पेट्रोलिंग पॉईंट १७ आणि १७ ए येथून चिनी सैन्य अद्याप मागे सरलेले नाही. तसेच डिसइन्गेजमेंट प्रक्रियेचे पालन करत नाही आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेत स्थळावर एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज अपलोड केला आहे. त्यामध्ये मे महिन्यापासून चीन एलएसीवर आक्रमकता वाढवत आहे. गलवान खोरे, पँगाँग त्सो, गोगरा हॉट स्प्रिंगसारख्या क्षेत्रात चीनची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India China FaceOff: China again played a cunning trick, advised India to withdraw from Pangong Tso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.