सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्यास भारत-चीन राजी, वरिष्ठ पातळीवरील शिष्टाईत झाली सहमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:15 IST2020-07-07T07:12:35+5:302020-07-07T07:15:31+5:30
र्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.

सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्यास भारत-चीन राजी, वरिष्ठ पातळीवरील शिष्टाईत झाली सहमती
नवी दिल्ली : सीमेवरून दोन्ही देशांमध्ये असलेले मतभेद वादामध्ये परिवर्तित होऊ न देण्यावर भारत व चीन यांच्यात सहमती झाली असून सीमेवर शांतता व सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन आठवड्यांपूर्वी २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांच्या सीमेवर झालेल्या बैठकीत सैन्यमाघारीवर सहमती झाली होती. तरी चीन प्रत्यक्ष माघार न घेता उलट गलवान खोरे व पॅनगाँग सरोवराच्या परिसरात अधिक घट्ट पाय रोवण्याची तयारी करत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर भारताचे सीमेसंबंधीचे विशेष प्रतिनिधी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून सुमारे दोन तास मनमोकळी व सर्वंकष चर्चा झाली.
भारतानेही ठोस पावले उचलावीत - चीन
तिकडे बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले की, सीमेवरील आमच्या सैन्याने गलवान खोºयातून माघार घेण्यास सुरुवात केली असून त्यांची ठरल्याप्राणे प्रगती सुरु आहे. भारतही तशीच ठोस कृतीकरून सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी पावले टाकेल, अशी आशा आहे.
दोघांचीही माघार सुरु
लष्करी कमांडरांच्या बैठकीत प्रत्यक्ष माघारीची सुरुवात ५ जुलैपासून करण्याचे ठरले होते. त्यानुसार चीनकडून कृती होत असल्याचे दिसल्यावर दोन्ही बाजूंनी संघर्षाचे कारण ठरलेल्या गलवान खोºयातील ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट १४’ (पीपी १४) या ठिकाणाहून आस्तेकदम माघारा सुरु केली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. दोन्ही बाजूंकडून अशीच सैन्यमाघार ‘पीपी १५’ व ‘पीपी १७’ या दोन्ही ठिकाणीही सुरु करण्यात आली आहे. गलवान व गोगरा हॉटस्प्रिंग येथून सैनिकांना घेऊन चिनी सैन्याची वाहने त्यांच्या बाजूच्या आणखी मागील भागात रवाना झालेली रविवारी दिसली होती. चीनने गलवान परिसरात व पॅनगाँग सरोवराकाठी ठोकलेले तंबूही काढले आहेत.
मतभेदांवरून वाद होऊ नये
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सीमेवरून मतभेद असले तरी ते वादात परिवर्तित न होऊ देण्याचे ठरविले होते. आधी ठरल्याप्रमाणे दोघांनी पूर्णपणे सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले. ही प्र्रक्रिया टप्प्याटप्प्याने व परस्परांच्या पडताळणीने करण्याचेही ठरले. सीमेवर शांततेला तडा जाईल अशी कोणताही घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा पूर्ण आदर करून ती बदलण्याची कोणतीही एकतर्फी कृती न करण्याची हमीही एकमेकांना दिली.