अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:14 IST2025-04-29T16:01:33+5:302025-04-29T16:14:11+5:30
भारताने देशाविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर भारताने शेजारील देश पाकिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेत कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यासह पाच महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताननेभारताला इशारा दिला होता. अनेक पाकिस्तानी नेत्यांनी भारताला धमकावलं होतं. त्यानंतर आता भारताला इशारा देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची बोलती बंद करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट ब्लॉक केले. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक पर्यटक होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे सतत भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत. भारताला त्यांनी अणुहल्ल्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांना भारतात गप्प करण्यात आले आहे.
एका मुलाखतीत, आसिफ यांना पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचे काम केले आहे का असं विचारलं. त्यावेळी मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे मान्य केले आहे. आम्ही जवळजवळ तीन दशकांपासून अमेरिका आणि ब्रिटनसह पश्चिमेसाठी हे घाणेरडे काम करत आहोत, असे आसिफ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडताना भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात पाकिस्तानच्या सहभाग असल्याचे म्हटलं.
यापूर्वी, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकी दिली होती की, पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे आणि आपल्या अस्तित्वाला थेट धोका असल्यास आमचा देश अण्वस्त्रांचा वापर करेल. याआधीही अनेक वेळा पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताविरुद्ध द्वेषपूर्ण विधाने केली आहेत.