सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:58 IST2025-05-16T10:55:10+5:302025-05-16T10:58:19+5:30

India Army Budget: एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षांत संरक्षण बजेट जवळजवळ तीन पटीने वाढले आहे.

India Army Budget: Indian Army will get a booster dose of budget; Government opens treasury after the success of Operation Sindoor | सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार

सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार

India Army Budget: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला आहे, परंतू येत्या काळात काय होईल, काही सांगता येत नाही. अशातच भारतीय सैन्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नवीन अत्याधुनिक शस्त्रे खरेदी केले जातील.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, पुरवणी अर्थसंकल्पात ₹50 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते. या अतिरिक्त वाटपातून सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी, संशोधन आणि विकास कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षणासाठी विक्रमी 6.81 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 9.53 टक्क्यांनी जास्त आहे. विशेष म्हणझे, एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षांत संरक्षण बजेट जवळजवळ तीन पटीने वाढले आहे.

भारताची मजबूत हवाई संरक्षण प्रणाली
2014-15 मध्ये संरक्षण बजेट 2.29 लाख कोटी रुपये होते. या वर्षी 6.81 लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. हे एकूण अर्थसंकल्पाच्या 13.45% आहे. ऑपरेशन सिंदूरने भारताची संरक्षण क्षमता दाखवून दिली आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान, भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतून लावले. यासाठी भारताने लांब पल्ल्याच्या रशियन एस-400 'ट्रायम्फ' प्रणालींव्यतिरिक्त बराक-8 मध्यम पल्ल्याच्या एसएएम प्रणाली आणि स्वदेशी आकाश प्रणाली तैनात केली आहे. पेचोरा, ओएसए-एके आणि एलएलएडी तोफा (लो-लेव्हल एअर डिफेन्स गन) सारख्या हवाई संरक्षण प्रणालींचा देखील वापर करण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ला अन् ऑपरेशन सिंदूर

22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटक आणि नागरिकांवर हल्ला केला, ज्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे भारताच्या दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाला आणखी बळकटी मिळाली. प्रत्युत्तरादाखल भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने समन्वय साधून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केले. या कारवाईने केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्या नाहीत, तर पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, भारत कोणत्याही दहशतवादी कारवाया सहन करणार नाही.

या कारवाईनंतर पाकिस्तानने 7-8 मे च्या रात्री श्रीनगर, जम्मू, पठाणकोट आणि अमृतसर येथील 15 भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. पण, भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराच्या एकात्मिक प्रयत्नांमुळे हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले गेले. सध्या दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला आहे.

Web Title: India Army Budget: Indian Army will get a booster dose of budget; Government opens treasury after the success of Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.