जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास किंचितसा घटला, मात्र जगात आजही टॉप 3मध्ये भारत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 10:15 IST2018-01-29T08:11:11+5:302018-01-29T10:15:18+5:30
देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते, अशा देशांच्या यादीत भारत सलग दुस-या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे.

जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास किंचितसा घटला, मात्र जगात आजही टॉप 3मध्ये भारत
नवी दिल्ली - देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते, अशा देशांच्या यादीत भारत सलग दुस-या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे. दरम्यान, दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताच्या या वर्षाची क्रमवारी आणि गुणांमध्ये वर्ष 2017 च्या तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे.
गेल्या वर्षी भारत क्रमवारीत अव्वल स्थानावर होता तर या वर्षी तिस-या स्थानावर पोहोचला आहे. जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या आर्थिक सुधारणांदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या क्रमवारीमुळे भारतातील मोदी सरकारला आणखी उत्साहानं काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे म्हटले जात आहे. 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नुसार, पहिल्या स्थानावर चीन, दुस-या स्थानावर इंडोनेशिया आणि तिस-या क्रमांकावर भारत आहे.
सरकारव्यतिरिक्त जनतेचं व्यापार वर्ग, एनजीओ आणि मीडियाकडेदेखील कसं पाहते, याचीदेखील दखल घेतली जाते, मात्र याबाबींमध्येही भारत ट्रस्ट झोनमध्ये येत असल्याचं अहवालात समोर आले आहे. जनतेचा सरकारवरील विश्वासासंबंधीच्या यादीत चीननं 74 अंकांसहीत उंच उडी घेत यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे, दरम्यान 2017मध्ये चीन 67 अंकांसहीत तिस-या क्रमांकावर होतो. तर वर्ष 2017मध्ये भारत 72 अंकांसहीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यंदा 68 अंकांसहीत भारत तिस-या क्रमांकावर घसरला आहे.
ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये सर्वाधिक नुकसान अमेरिकेचं झाले आहे. तर चीनला सर्वाधिक फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुसरीकडे सरकार, मीडिया, एनजीओ आणि व्यापार संबंधित भारतातील जनतेचा सरकारवरील विश्वास पाहिला तर एकूण 13 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या घसरणीनंतरही भारत विश्वासाच्या श्रेणीमध्ये मोडतो.