डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 20:26 IST2025-08-26T20:25:20+5:302025-08-26T20:26:14+5:30
India-America: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५०% कर लावल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
India-America: भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर चर्चा सुरू होती, पण अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लावण्याची घोषणा केली. ट्रम्प इथेच थांबले नाहीत, त्यांनी रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त २५% कर लावला. अशाप्रकारे भारतावर एकूण ५०% कर लावल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. अशातच, एका जर्मन वृत्तपत्राने दावा केला आहे की, ट्रम्प यांनी टॅरिफ वादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार वेळा फोन केला, परंतु पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला.
ट्रम्प यांचा चार वेळा फोन
जर्मन वृत्तपत्र FAZ ने दावा केला आहे की, पंतप्रधान मोदी भारताला मृत अर्थव्यवस्था म्हणल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे २५ वर्षांचे भारत-अमेरिका संबंध बिघडले आहेत. अशातच, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींना चार वेळा फोन केला, परंतु पीएम मोदींनी त्यांना बोलण्यास नकार दिला.
Very Credible German newspaper FAZ claims that #Trump tried to call PM Modi 4 times in recent weeks but Modi refused to attend those calls
— Siddhant Mishra (@siddhantvm) August 26, 2025
Neither of the sides confirms or denies this claim pic.twitter.com/nKblLM86kQ
पंतप्रधान मोदी ट्रम्पवर नाराज ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३१ जुलै रोजी म्हटले होते की, भारत रशियासोबत काय करतो, याची मला पर्वा नाही. दोघेही मिळून त्यांच्या मृत अर्थव्यवस्थांना खाली आणू शकतात. आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार केला आहे, त्यांचे कर खूप जास्त आहेत. ते जगातील सर्वात जास्त कर असलेल्या देशांपैकी एक आहेत. ट्रम्प यांच्या याच टिप्पणीवर पंतप्रधान मोदी नाराज आहेत.
जर्मन वृत्तपत्राचा दावा आहे की, ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यानंतर चार वेळा पंतप्रधान मोदींना फोन केला, मात्र मोदींनी बोलण्यास नकार दिला. सध्याची परिस्थिती पाहता भारत खूप सावध पावले उचलत आहे. पंतप्रधान मोदींना अमेरिकन कृषी व्यवसायासाठी भारताची बाजारपेठ खुली करायची नाही. मात्र, ट्रम्प यासाठीच भारतावर दबाव आणत आहेत. अमेरिकेचा भारतावरील ५० टक्के कर उद्या, म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून लागू होईल. अशा परिस्थितीत भारत काय करतो, हे पाहणे महत्वाचे आहे.