अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:03 IST2025-11-19T19:03:11+5:302025-11-19T19:03:51+5:30
India-Afghanistan Relation : बदलत्या जिओपॉलिटिकल समीकरणांत हा दौरा महत्वाचा.

अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
India-Afghanistan Relation : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर काही काळ गोठलेले भारत-अफगाणिस्तान संबंध आता हळूहळू नव्या दिशेने पुढे जात आहेत. औपचारिक राजनैतिक मान्यता नसली तरी, दोन्ही देश आर्थिक आणि व्यापारिक सहकार्य वाढवण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री नूरुद्दीन अजीजी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. द्विपक्षीय व्यापार वाढ, भारतीय गुंतवणूक व औद्योगिक सहकार्य, चाबहार बंदराचा अधिक प्रभावी वापर आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीचे पर्याय यावर चर्चा होऊ शकते.
दौऱ्यातून बदलत्या जियोपॉलिटिक्सचा संकेत
तज्ज्ञांचे मत आहे की, अजीजी यांचा हा दौरा फक्त शिष्टाचार भेट नाही, तर बदलत्या प्रादेशिक शक्तिसंतुलनाचा एक भाग आहे. या दौऱ्यामुळे अफगाणिस्तानला तातडीच्या आर्थिक मदतीचे मार्ग खुले होतील आणि भारताला मध्य आशियातील आपली रणनीतिक उपस्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे, भारताने अद्याप तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नाही. तरीही व्यापार, मानवीय मदत आणि प्रोजेक्ट कनेक्टिव्हिटी यांमध्ये दोन्ही देश व्यावहारिक सहकार्याला प्राधान्य देत आहेत.
A warm welcome to Afghan Industry and Commerce Minister, Alhaj Nooruddin Azizi, on his official visit to India.
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 19, 2025
Advancing bilateral trade and investment ties is the key focus of the visit. pic.twitter.com/nE0kQSDqkF
भारत-अफगाणिस्तान संबंधांची नवी दिशा
पाकिस्तानसोबतचे संबंध खराब झाल्यानंतर तालिबान सरकार भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. भारतही अफगाणिस्तानातील आपले मोठे प्रोजेक्ट्स, गुंतवणूक आणि रणनीतिक पायाभूत सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवहारिक डिप्लोमसी वापरत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यानंतर भारताने अफगाणिस्तानमधील आपले दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अफगाणी वाणिज्य मंत्री भारत दौऱ्यावर आले आहेत.
भारताचे परराष्ट्र धोरण
तालिबानला राजकीय मान्यता नाही, पण भारताने थेट संवाद आणि आर्थिक सहकार्य सुरू ठेवले आहे. याचे कारण म्हणजे, हा मार्ग पाकिस्तान आणि चीनच्या प्रभावाला आव्हान देण्यास मदत करतो. तसेच, अफगाणिस्तानने अलिकडे घेतलेले निर्णय भारताला लाभदायक आहेत. यामध्ये एरियाना एअरलाईनने काबूल-दिल्ली कार्गो रुटचे भाडे कमी केले असून, यामुळे अफगाण व्यापाऱ्यांना भारतीय बाजारपेठेत माल पाठवणे अधिक सोपे झाले आहे.