अयोध्येत सुरक्षा वाढवली; ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:31 IST2019-11-17T02:18:21+5:302019-11-17T06:31:48+5:30
बाबरी मशीद पतन दिनाच्या ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा वाढविण्यात आली आहे

अयोध्येत सुरक्षा वाढवली; ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
अयोध्या : बाबरी मशीद पतन दिनाच्या ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विशेषत: रामजन्मभूमी परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी दिली.
अनुज कुमार झा म्हणाले की, शांतता आणि सद्भाव कायम ठेवणे याकडे आम्ही लक्ष देत आहोत. अयोध्येतील नागरिक परिपक्वता दाखवून शांतता राखतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येतील सुरक्षा चार पातळीवर ठेवण्यात आली आहे. रेड झोनमध्ये २.७७ एकर जागेचा समावेश आहे. यलो झोनमध्ये शहर आणि ग्रीन झोनमध्ये जिल्हा व ब्लू झोनमध्ये शेजारील परिसर यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात रामजन्मभूमीबाबत निर्णय दिलेला आहे. रामजन्मभूमी परिसरात हजारो भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात २८ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी झा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील लोकांनी अत्यंत परिपक्वता दाखवून शांतता राखली.
अयोध्येतील परिस्थितीवर सुरक्षा जवान लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियातील हालचालींवर पोलीस निगराणी करत आहेत. शहरातील हनुमान गढी, कनक भवन, दशरथ महाल आदी ठिकाणी ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.