गुन्ह्याशिवाय तुरुंगात, ४३ वर्षांनी निर्दोष सुटका, आता काढणार देशाबाहेर? कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:42 IST2025-10-30T14:41:26+5:302025-10-30T14:42:01+5:30
USA Crime News: चुकीचा तपास आणि कोर्टात अनेक वर्षे चाललेता खटला यामुळे एखादी निर्दोष व्यक्ती अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र असे प्रकार केवळ भारतातच घडतात असं नाही तर अमेरिकेतूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गुन्ह्याशिवाय तुरुंगात, ४३ वर्षांनी निर्दोष सुटका, आता काढणार देशाबाहेर? कारण काय?
चुकीचा तपास आणि कोर्टात अनेक वर्षे चाललेता खटला यामुळे एखादी निर्दोष व्यक्ती अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र असे प्रकार केवळ भारतातच घडतात असं नाही तर अमेरिकेतूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुब्रह्मण्यम वेदम असं या प्रकरणातील पीडित व्यक्तीचं नाव असून, त्यांना कुठलाही गुन्हा केलेला नसताना केवळ संशयामुळे तब्बल ४३ वर्षे तुरुंगात काढावी लागली. तर आता निर्दोष सुटल्यानंतर त्यांच्यासमोर एक वेगळंच संकट उभं राहिलं आहे. वेदम यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितनुसार भारतीय वंशाच्या सुब्रह्मण्यम वेदम यांना ते २० वर्षांचे असताना कॉलेजमधील एका मित्राच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा संशयावरून अटक करण्यात आली होती. पुढे या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली तेव्हा त्यांचं वय ६० हून अधिक झालं होतं. वेदम यांचा जन्म भारतात झाला होता. मात्र ते लहानाचे मोठे अमेरिकेतच झाले. दरम्यान, १९८० मध्ये सुब्रह्मण्यम यांचा कॉलेजमधील मित्र टॉम किंसर याची हत्या झाली होती. हा टॉम सुब्रह्मण्यम यांच्यासोबत शेवटचा दिसला होता. त्यामुळे संशयाच्या आधारावर पोलिसांनी सुब्रह्मण्यम यांना अटक केली होती. या प्रकरणाता कुठलाही पुरावा, साक्षीदार नव्हता. तरीही पोलिसांनी त्यांना दोषी मानले होते. तसेच परदेशी नागरिक असल्याने त्यांना जामीनही दिला गेला नाही. त्यांच्याकडील पासपोर्ट आणि ग्रीनकार्ड जप्त करण्यात आले. अखेरीस १९८३ साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. सुब्रह्मण्यम यांनी याविरोधात अनेकदा अपील केले. अखेरीस २०२१ मध्ये नवे पुरावे समोर आल्यानेन या खटल्याची फाईल पुन्हा उघडली. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२५ रोजी कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केलं.
मात्र आता सुब्रह्मण्यम यांच्यासमोर वेगळंच संकट उभं राहिलं आहे. संपूर्ण तारुण्य तुरुंगात खितपत पडल्यानंतर म्हातारपणी निर्दोष मुक्त झालेल्या सुब्रह्मण्यम यांना भारतात पाठवण्याची तयारी अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना इमिग्रेशन विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून, त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आता सुब्रह्मण्यम यांचे कुणीही नातेवाईक भारतात राहत नाहीत. सुब्रह्मण्यम यांचे आई-वडील एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त भारतात आले असताना त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर ९ महिन्यांनी ते आई वडिलांसोबत अमेरिकेत गेले होते. तसेच तिथेच त्यांचं शिक्षण झालं होतं.
सुब्रह्मण्यम यांचे आजी-आजोबा, आई-वडील सर्वांचं निधन झालं आहे. अशा परिस्थितीत भारतात त्यांचा कुणीही नातेवाईक नाही. त्यामुळे सुब्रह्मण्यम यांना अमेरिकेतच ठेवावे, अशी विनंती त्यांच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या बहिणीने केली आहे.