शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

एका नेत्याला नमस्कार, दुसऱ्याला...; दिल्लीत 'कमळ' कोमेजले, कुरबुरी वाढल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 08:12 IST

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही. त्यात ज्येष्ठ नेत्यांमधल्या विसंवादाच्या गाठी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत!

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप श्रेष्ठींमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव ओसरण्याचे नाव घेत नसून उलट वाढत चालला आहे. आता एकमेकांशी बोलणेही बंद झाल्यात जमा आहे, असे सांगितले जाते. नीति आयोगाच्या बैठकीसाठी योगी दिल्लीत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षातील श्रेष्ठींना ते भेटतील, अशी अपेक्षा होती.  योगी आणि त्यांचे  दोन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यात संवाद उरलेला नसल्यामुळे दिल्ली दौऱ्यात यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल, अशी अटकळ होती. परंतु, तसे काहीच घडले नाही. याउलट पक्षात एकोपा कसा राहिलेला नाही हे दाखवणारा एक व्हिडीओ प्रसारित झाला.

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते त्या बैठकीत सहभागी होणार होते. बैठकीवेळी योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जवळून जात असताना त्यांना अभिवादन  केले नाही, असे त्या व्हिडीओत दिसत होते. योगी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे वाकून स्वागत केले, पण त्यांनी जे. पी. नड्डा यांना नमस्कार केला नाही. हे सारे दाखवणाऱ्या व्हिडीओमुळे खळबळ माजली. केंद्रीय नेत्यांशी प्रत्यक्षात भेट न होताच योगी लखनौला परतले. ‘वेगळा पक्ष’ म्हणवल्या जाणाऱ्या भाजपत असे कधी घडले नव्हते. या कटू प्रकरणाचा शेवटचा अध्याय नेमका काय लिहिला जातो, ते आता पाहायचे!

मौर्य यांनी पुन्हा तोफ डागली

भाजप श्रेष्ठींनी योगी आदित्यनाथ यांना गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्य केले आहे. मात्र या ‘बुलडोझर बाबा’चा प्रभाव केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर देशात इतरत्रही आहे. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण करणे तेवढे सोपे नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी केवळ ३३ जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर योगी यांच्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न श्रेष्ठींनी सुरू केले. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवात त्यांना यासंदर्भात संधी दिसली. योगी स्वतःहून पराभवाची जबाबदारी पत्करून राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही घडले नाही. उलट आपण केलेल्या शिफारसी डावलून अपात्र उमेदवारांना तिकिटे दिली गेली, असा जाहीर आरोप योगी यांनी केला. एकप्रकारे त्यांनी पराभवाचे खापर पक्षाच्या श्रेष्ठींवर फोडले. याचा अर्थ त्यांची पायउतार होण्याची अजिबात इच्छा नाही, असाच निघतो. 

योगी यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी उघडपणे नाव न घेता ‘पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही’ असे माध्यमांना सांगायला सुरूवात केली. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला मौर्य आणि दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक गेलेच नाहीत. योगी लखनौत परतल्यावर मौर्य यांनी दुसरी तोफ डागली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर न घालताच मौर्य यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध मोहीम सुरू करण्यासाठी महानिरीक्षक आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वास्तविक मौर्य यांच्याकडे गृहखाते नाही; ते योगी यांच्याकडे आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांना मुद्दाम उचकवून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न होता.

योगी आपणहून राजीनामा देतील तर बरे, शक्यतो त्यांना नारळ देण्याची वेळ येऊ नये, अशा पेचात भाजप श्रेष्ठी सापडले आहेत. उत्तर प्रदेशातील इतर मागासवर्गीयांनी मोठ्या प्रमाणावर भाजपची साथ सोडली असून, दलितही त्याच मार्गाने जात आहेत याची श्रेष्ठींना कल्पना आहे. योगी यांची हकालपट्टी केली तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील हे त्यांना समजते. त्यामुळे योगी यांना बाजूला करूनही नुकसान कसे होणार नाही, याचे सूत्र शोधण्याचा प्रयत्न होत असल्याने निर्णयाला विलंब होत आहे. दरम्यान, मौर्य एकामागून एक तोफा डागत राहतील, असे दिसते.

राहुल गांधींना चूक करू द्या!

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबतचा पवित्रा बदलला असल्यामुळे राजकीय पंडित मात्र बुचकळ्यात पडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडू द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचवल्याचे कळते. प्रतिहल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहावी, असा विचार त्यामागे आहे. दुसरे म्हणजे लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यातून पक्ष अद्याप सावरलेला नाही. महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणातील निवडणुका तोंडावर असताना त्या जिंकण्यासाठी योग्य ते डावपेच आखायलाही वेळ दिला गेला पाहिजे, असे पक्षाला वाटते. या तीन राज्यांपैकी किमान दोन राज्यांत पक्षाला यश मिळाले तरच पूर्वीचा वरचष्मा राखला जाईल हे उघडच आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पक्ष काय करणार, हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र महाराष्ट्रासह किमान दोन राज्यांत विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. म्हणून भाजप राहुल गांधी यांच्याबाबतीत धारदार भूमिका न घेता त्यांच्याकडून मोठी चूक होण्याची वाट पाहत आहे. राहुल गांधी यांचे प्रयत्न दरम्यान चालू आहेतच!

जाता जाता : नीती आयोगात काही तालेवार मंत्र्यांचा समावेश केला गेला. मात्र त्या यादीत एक वजनदार नाव दिसले नाही, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल! त्यांचा समावेश नीती आयोगात कसा झाला नाही, याचे अनेकांना आश्चर्य वाटते आहे.

 

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण