"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 17:42 IST2025-08-27T17:40:17+5:302025-08-27T17:42:54+5:30
भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही अशी खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली.

"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
सूरजपूर - छत्तीसगडच्या एका भाजपा नेत्याने मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांना पत्र लिहून इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठीही आता पैसे शिल्लक नाहीत त्यामुळे मला इच्छामरण हवं आहे असं त्यांनी पत्रात लिहिलंय. सूरजपूर भाजपाचे माजी मंडल महामंत्री विशंभर यादव एका अपघातानंतर दिव्यांग बनले होते. विशंभर यादव यांचे कुटुंब सुरुवातीपासून भाजपाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील आरएसएसमध्ये पदाधिकारी होते.
अपघातानंतर बनले दिव्यांग
२ वर्षापूर्वी रायपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होती. त्यात सहभागी होण्यासाठी भाजपाचे तत्कालीन मंडल महामंत्री विशंभर यादव कार्यकर्त्यांसोबत बसमधून जात होते. त्यावेळी बसचा अपघात झाला. या अपघातात विशंभर यादव यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना ते कायमचे दिव्यांग बनले. आता घरची परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक ताण त्यांच्यावर आला आहे. संघटनेकडूनही काही मदत मिळत नाही त्यामुळे विशंभर यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे.
भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही
तर मी शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झालो आहे आणि माझ्या कुटुंबालाही माझ्यामुळे त्रास होत आहे. ज्या पक्षासाठी मी माझे आयुष्य घालवले त्या पक्षाकडून मला कोणताही पाठिंबा मिळाला नाही. आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून मी इच्छामरण मागितले आहे. भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही अशी खंत विशंभर यादव यांनी बोलून दाखवली. तर दुसरीकडे विशंभर यादव यांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिले आहे. त्यांनी यादव कुटुंबियांशीही संवाद साधला आहे.
दरम्यान, आर्थिक तंगीमुळे भाजपा नेते विशंभर यादव यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली, त्यानंतर मी त्यांच्या पत्नीशी संवाद साधला. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर दिला. त्यांच्या उपचारासाठी सगळी व्यवस्था केली जाईल. रायपूर येथे त्यांनी उपचारासाठी यावे अशी विनंती केली आहे. त्यांना चांगले उपचार मिळतील आणि ते लवकर बरे होतील हा आमचा प्रयत्न आहे असं भूपेश बघेल यांनी सांगितले.