गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापले; CCTV कॅमेरे तोडले, चोरीची रक्कम पाहून पोलिसही अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 14:58 IST2022-12-27T14:58:14+5:302022-12-27T14:58:24+5:30
बिहारमधील छपरा येथून एक चोरीची अजब घटना समोर आली आहे.

गॅस कटरच्या साहाय्याने ATM कापले; CCTV कॅमेरे तोडले, चोरीची रक्कम पाहून पोलिसही अवाक्
Chhapra ATM Robbery News | नवी दिल्ली : बिहारमधील छपरा येथून एका चोरीची अजब घटना समोर आली आहे. इथे चोरट्यांनी सेंट्रल बँकेच्या एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून सुमारे 8 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. ही घटना छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन परिसरातील आहे. खरं तर चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएम मशीन चोरी करण्यापूर्वी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि हार्ड डिस्कही पळवून नेला.
दरम्यान, चोरट्यांनी रात्रभर गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन कापले, पण पोलिसांना यांची माहिती देखील मिळाली नाही. सकाळी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करण्यास सुरूवात केली. एटीएमचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आहेत. याआधीही मुफसिलच्या मेथवालियामध्ये एका खासगी बँकेचे एटीएम चोरण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी चोरटे एटीएम कापू शकले नाही. लक्षणीय बाब म्हणजे सेंट्रल बँकेने 8 लाख 75 हजारांची चोरी झाल्याचा दावा केला आहे.
चोरट्यांनी केले मोठे नुकसान
बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक विकास कुमार यांनी सांगितले की, 8,75,000 ची रोकड चोरीला गेली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्ड डिस्कचे देखील मोठे नुकसान केले आहे. मुफसिल पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्याची माहिती समोर येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"