बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:12 IST2025-10-04T19:12:07+5:302025-10-04T19:12:59+5:30
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. तसेच सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्कं करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवास्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला.

बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...
बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. तसेच सर्वच पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्कं करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवास्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवास्थानी आरजेडीचे आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी आम्हाला चोरटा आमदार नको, सतीश कुमार यांना हरवायचं आहे, अशी घोषणाबाजी केली.
बिहारमधील मखदुमपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्ते आज मखदुमपूर विधानसभा मतदारसंधातून पाटणा येथे आले होते. कार्यकर्ते अचानक लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी घुसले. विद्यमान आमदार सतीश कुमार यांनी कुठलंही काम केलेलं नाही. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली.
विरोधानंतरही राष्ट्रीय जनता दलाने सतीश कुमार यांना उमेदवारी दिली तर जनता याला विरोध करेल, असा इशारा आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना दिला. सतीश कुमार यांच्याऐवजी मतदारसंघाचा विकास करणाऱ्या आणि लोकहिताची काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्व केला. मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होती. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीच्या नेतृत्वाची अडचण वाढली आहे. तसेच तिकीट वाटपावरून अंतर्गत विरोधही वाढला आहे. तसेच मखदुमपूर येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहिला आहे.