'एकतर्फी प्रेमात' पागल तरूणाचा तरूणीने नंबर केला ब्लॉक; वेडा प्रियकर टॉवरवर चढला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 19:52 IST2022-12-04T19:48:32+5:302022-12-04T19:52:14+5:30
राजस्थानमधील एका प्रेमवेड्या तरूणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

'एकतर्फी प्रेमात' पागल तरूणाचा तरूणीने नंबर केला ब्लॉक; वेडा प्रियकर टॉवरवर चढला अन्...
नवी दिल्ली : राजस्थानमधील एका प्रेमवेड्या तरूणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तरूणाने आपल्या प्रेमासाठी हाय व्होल्टेज ड्रामा करून तरूणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका माथेफिरू प्रियकराने असे कृत्य केले की तब्बल तासभर पोलीस आणि प्रशासनाला चिंतेत टाकले. या वेड्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला, त्यानंतर तो मोबाईल टॉवरवर गेला. तासाभरानंतर पोलीस प्रशासनाने त्याला खाली आणले आणि नंतर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली.
माहितीनुसार, ही घटना भीलवाडा जिल्ह्यातील बदनौर शहरातील आहे. बदनौर येथील प्रकाश प्रजापत याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो तरुणीला वारंवार फोन करून त्रास देत असे. त्यामुळे त्रासलेल्या तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला. यामुळे तो संतप्त झाला. त्यानंतर तो मोबाईल टॉवरवर चढला आणि तरुणीशी बोलण्याचा हट्ट करू लागला. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली. मग परिसरातील लोक टॉवरखाली जमा होऊ लागली.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली धाव
लोकांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले पण तो मान्य झाला नाही आणि टॉवरवर चढत राहिला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील खाली उतरण्यासाठी आग्रह केला, मात्र तरीदेखील तरूण खाली उतरला नाही. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तरूणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने ऐकले नाही आणि आधी मुलीशी बोला, मग खाली येईल, अशी मागणी त्याने केली.
पोलिसांनी तरूणाला केली अटक
जवळपास तासभर फोनवरून त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर तरुणाने एका फोनवर तरुणीला समोर आणण्याची मागणी केली. यानंतर गावातील काही लोकांनी मुलीच्या घरी जाऊन व्हिडीओ कॉलवरून तरूणाशी संवाद साधायला सांगितला. त्यानंतर तो तरुण खाली उतरला. तरुण खाली उतरताच शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"