७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:55 IST2025-08-17T17:14:53+5:302025-08-17T17:55:24+5:30

आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.

In 7 days affidavit will have to be given or an apology will have to be made to the country, ECI Gyanesh Kumar on Rahul Gandhi's allegations | ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज

७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज

नवी दिल्ली - निवडणूक आयोग आणि मतदार यादीवरून जे आरोप लावण्यात आलेत, ते निराधार आणि खोटे आहेत. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा संपूर्ण देशाची माफी मागावी असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता केले आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदार याद्यांमधील सुधारणा ही एक सामूहिक जबाबदारी आहे. बिहारमध्ये आमच्या बूथ लेवल अधिकाऱ्यांनी बूथ लेवल एजेंट आणि राजकीय पक्षांसोबत मिळून काम केले आहे. एक पीपीटी दाखवून ज्यात निवडणूक आयोगाचे आकडे नाहीत. चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करणे आणि त्यात एखाद्या महिलेने २ वेळा मतदान केल्याचे सांगणे हे खूप गंभीर आरोप आहेत. विना प्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही, कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्या सर्व मतदारांना गुन्हेगार ठरवणं आणि निवडणूक आयोग गप्प बसेल हे शक्य नाही. प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल, इतर तिसरा पर्याय नाही. जर ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र दिले नाही तर त्याचा अर्थ हे सर्व आरोप निराधार होते. जे मतदारांना बोगस म्हणत आहेत, त्यांनी माफी मागायला हवी असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता म्हटलं. 

दरम्यान, भारतात ६० टक्क्यांहून अधिक मतदान होते, ज्याचा जगातील मोठमोठे लोकशाही देश विचारही करू शकत नाही. जगातील सर्वात मोठी मतदार यादी आपल्याकडे आहे. जवळपास ९० ते १०० कोटी मतदार आहेत. सर्वात मोठी मतदार यादी, सर्वात मोठी निवडणूक कर्मचाऱ्यांची फौज, सर्वात जास्त मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आणि या सर्वांच्या समक्ष सर्व मीडियासमोर हे सांगणे, मतदार यादीत आणखी एकदा तुमचं नाव आहे त्यामुळे तुम्ही दोनदा मतदान केले आणि गुन्हा केला आहे, मतदारांना गुन्हेगार ठरवणे आणि निवडणूक आयोगाने शांत राहणे हे शक्य नाही असंही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले आहे. 

Web Title: In 7 days affidavit will have to be given or an apology will have to be made to the country, ECI Gyanesh Kumar on Rahul Gandhi's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.