IMD expects monsoons to be 96% this year | यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज 
यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज 

मुंबई - वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीयहवामान खात्याने आज शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीयहवामान खात्याने वर्तवला आहे. 

मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल, याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते़. दरम्यान, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आज दुपारी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला तरी नंतर तो क्षीण होईल. तसेच अखेरीपर्यंत मान्सून आपली सरासरी गाठेल, तसेच एकूण सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खातयाने वर्तवला आहे.  

 यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था,आॅस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट यांनी व्यक्त केला आहे़ स्कायमेटने यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे आता भारतीय हवामान खाते मान्सुनबाबत नेमका काय अंदाज वर्तवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

 यंदाच्या पावसाचे काय?
गेल्या वर्षी भारतीय हवामान विभाग व स्कायमेटने ९७ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता़ मात्र, २०१८ मध्ये सरासरीच्या ९१ टक्के पाऊस होऊन देशाच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पाऊस कसा असणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. 


Web Title: IMD expects monsoons to be 96% this year
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.