'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:34 IST2024-02-02T18:33:06+5:302024-02-02T18:34:10+5:30
'मला वाटत नाही की, काँग्रेस 40 जागाही जिंकू शकेल.'

'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
Congress vs TMC : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. अलीकडेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका करत राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. आता परत एकदा त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेस पक्ष एवढा अहंकारी का आहे, हे मला समजत नाही', असा घणाघात त्यांनी केला.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही काँग्रेसला ज्या 300 जागांवर लढण्यास सांगितले होते, त्यापैकी 40 जागाही ते जिंकू शकतील की नाही, अशी शंका आमच्या मनात आहे. काँग्रेस पक्ष पूर्वी जिथे जिंकायचा, तिथेही आता पराभूत होत आहे. काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर बनारसमध्ये(वाराणसी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) भाजपचा पराभव करुन दाखवावे.
संबंधित बातमी- 'काँग्रेस-TMC मध्ये जागावाटपावर चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल', राहुल गांधींचे मोठे विधान
त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये आली, पण त्यांनी मला सांगितले नाही. आम्ही इंडिया आघाडीत आहोत, मात्र असे असूनही मला याबाबत माहिती देण्यात आली नाही. याबाबत मला प्रशासनाकडून माहिती मिळाली.' राहुल गांधी यांच्या मुर्शिदाबादमधील विडी कामगारांच्या भेटीवरही बॅनर्जी यांनी निशाणा साधला. 'आजकाल फोटोशूटचा नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. चहाच्या टपऱ्यांवर कधीही न गेलेले लोक आता विडी कामगारांसोबत बसून फोटो क्लिक करत आहेत,' असा टोमणा त्यांनी यावेली लगावला.