सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 06:19 IST2025-11-25T06:15:16+5:302025-11-25T06:19:54+5:30
Mobile SIM Card: तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांमध्ये वापरले गेले, तर मूळ मालकालाही कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाऊ शकते, असा कडक इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे. सिम कार्ड इतरांना देताना मोबाइल वापरकर्त्यांनी अत्यंत खबरदारी बाळगावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
नवी दिल्ली - तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांमध्ये वापरले गेले, तर मूळ मालकालाही कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाऊ शकते, असा कडक इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे. सिम कार्ड इतरांना देताना मोबाइल वापरकर्त्यांनी अत्यंत खबरदारी बाळगावी, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
आयएमईआय क्रमांकात छेडछाड केलेले फोन वापरणे धोकादायक ठरू शकते. बनावट कागदपत्रांवर सिम घेणे, इतरांच्या नावावर सिम घेणे वा स्वतःच्या नावावर घेतलेले सिम दुसऱ्याला देणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन असून, त्याचे परिणाम मूळ ग्राहकालाही लागू होतील.
सीएलआय बदलणारे ॲप्स टाळा
कॉल करताना दिसणारा नंबर (कॉलिंग लाईन आयडेंटिटी-सीएलआय) बदलून दाखवणारी ॲप्स किंवा वेबसाइट्स वापरू नयेत, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
मूळ सिमधारकालाच शिक्षा...
मोबाइल वापरकर्त्यांनी आपल्या नावावरचे सिम कोणालाही देऊ नये, असेही विभागाने कडक शब्दांत सांगितले आहे.
सिमचा गैरवापर झाल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, ५० लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू शकतात.
दूरसंचार कायदा, २०२३ आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम २०२४ अंतर्गत या कठोर कारवायांची तरतूद आहे.
९.४२ लाख सिम कार्ड्स आणि २.६३३४८ लाख आयएमईआय क्रमांकाचा वापर सायबर फसवणुकीसाठी देशात झाला आहे.
७.७५ लाख सिम कार्ड्स मार्च २०२५ पर्यंत ब्लॅाक करण्यात आली आहेत.
२४५% वाढ दिल्लीमध्ये सिम-ब्लॉकिंग प्रकरणात झाली आहे.
सिमकार्डचा गैरवापर ? : सायबर फसवणूक I ओटीपी चोरण I व्हॉट्सॲप हॅकिंगसाठी I बनावट लोन
सिम आणि मोबाइलची माहिती अशी मिळवा
मोबाइल वापरकर्त्यांनी आपल्या फोनचा आयएमईआय क्रमांक आणि सिम तपशील संचार साथी पोर्टल किंवा ॲपवरून पडताळावा.
यात फोन ब्रँड, मॉडेल, निर्माता यांची माहिती सहज पाहता येते. सरकारने सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली असून, सिमचा गैरवापर थांबवण्यासाठी देशभरात तपासणी वाढवली आहे, असे विभागाने म्हटले.
आयएमईआय बदलणारी उपकरणे बाळगणेही गुन्हा
आयएमईआय बदणारी उपकरणे, जसे मॉडेम, सिम बॉक्स, बदलता येणारी आयएमईआय मॉड्यूल्स बाळगणे, वापरणे किंवा विकणेही गुन्हा ठरतो. परदेशातून आणलेल्या व छेडछाड केलेल्या उपकरणांपासूनही दूर राहण्याचे आवाहन विभागाने केले आहे.