लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:57 IST2025-12-18T13:56:25+5:302025-12-18T13:57:32+5:30
खासदार अजय भट्ट यांच्या या भाषणाची चर्चा संसदेत आणि संसदेबाहेरही होत आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनरेगा योजनेच्या नावावरून मोठा गोंधळ झाला. सरकारकडून मनरेगाऐवजी नवी योजना नाव बदलून आणली आहे त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यावेळी उधमपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार अजय भट्ट यांनी सरकारची बाजू मांडत संसदेत राम नावाचा महिमा सांगत प्रत्येक समस्यांवर एकच उपाय राम असल्याचं म्हटलं.
संसदेच्या चर्चेत भाजपा खासदार अजय भट्ट यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, काँग्रेस विनाकारण हा वाद उचलत आहे. योजनेच्या नावात कुठेही बदल नाही. राम, हे राम, श्री राम, जय राम, जय जय राम हे ९ शब्द एक सिद्ध मंत्र आहे. जे स्वत: महात्मा गांधी यांनी स्वीकारले होते. त्यामुळे जी राम जी योजनेत काही चुकीचे नाही. आम्ही महात्मा गांधींचा सन्मान आधीसारखाच करत आहोत परंतु जर एखाद्या योजनेत राम शब्द येत असेल तर काँग्रेसला राग येतो. विकसित भारत जी राम जी असं योजनेचे नाव आहे. ज्याचा संपूर्ण अर्थ विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँन्ड मिशन ग्रामीण असा आहे. जर या राम शब्द जोडला असेल तर त्यातून काँग्रेसला त्रास का होतोय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्याशिवाय राम नावाचा उल्लेख करत अजय भट्ट यांनी अनेक उदाहरणे दिली जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहेत. राम एक सिद्ध मंत्र आहे. ज्याचा जप केल्यास प्रत्येक काम होते. जर मुलीचे लग्न होत नसेल तर राम राम जपा, नोकरी लागत नसेल तर राम राम बोला, घरात वाद असतील राम नामाचा जप करा. पती-पत्नी यांच्यात पटत नसेल तर राम राम जपा. नाते बिघडले तर रामराम जप करा. इतकेच नाही तर जर गाय दूध देत नसेल तर राम राम नावाचा जप करा. प्रत्येक समस्येवर समाधान मिळेल असंही भाजपा खासदार अजय भट्ट यांनी सांगितले.
🔴BJP MP Ajay Bhatt की टिप्पणी से Lok Sabha में छाया हंसी का माहौल#AjayBhatt#LokSabha#BJP#Parliament#ShriRam#JaiShriRam#PoliticalMoment#ViralClip#IndianPoliticspic.twitter.com/VkyaB4YyjW
— DD Uttar Pradesh(DDUP)डीडी उत्तर प्रदेश(डीडी यूपी) (@DDUttarPradesh) December 18, 2025
दरम्यान, खासदार अजय भट्ट यांच्या या भाषणाची चर्चा संसदेत आणि संसदेबाहेरही होत आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही युजर्स खासदारांच्या भाषणाचे समर्थन करत आहेत तर काही त्यांच्यावर टीका करून प्रश्न विचारत आहेत. काही जणांनी योजनेचे नाव बदलले म्हणून रोजगार मिळणार आहे का असा प्रश्न सरकारला करत आहेत.