‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:49 IST2025-04-15T09:49:33+5:302025-04-15T09:49:58+5:30
Indrajit Saroj News: समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार इंद्रजीत सरोज यांनी हिंदू देवदेवता आणि मंदिरांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात सरोज यांनी हे विधान केले.

‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार इंद्रजीत सरोज यांनी हिंदू देवदेवता आणि मंदिरांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात सरोज यांनी हे विधान केले. हिंदू मंदिरांच्या शक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, भारतातील मंदिरांमध्ये ताकद असती तर मोहम्मद बिन कासिम, महमूद गझनी, मोहम्मद घौरीसारखे लुटारू देशात आले नसते. जर कुठे ताकद असेल तर ती सत्तेच्या मंदिरात आहे. त्यामुळेच बाबा आपलं मंदिर सोडून सत्तेच्या मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच हेलिकॉप्टरमधून फिरण्याचं काम करतात.
रामनामाचा जप करून काही होणार नाही, उलट जय भीमची घोषणा दिली तर तुम्ही पुढे जाल असेही सरोज म्हणाले. स्वत:ला जय भीमचा खरा अनुयाई म्हणत इंद्रजित सरोज यांनी या घोषणेमुळे मी पाच वेळा आमदार आणि एकदा मंत्री झालो, असे सांगितले. यावेळी त्यांनी रामचरितमानस लिहिणाऱ्या तुलसीदास यांच्याबाबतही सरोज यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. जर कुणी खालच्या जातीमधील व्यक्ती शिकली तर ती बाब सापाला दूध पाजण्यासारखी असेल, असे तुलसीदास यांनी लिहिले आहे, असा दावा त्यांनी केला.
तुलसीदास यांनी आमच्याबाबत खूप काही लिहिलं. मात्र अकबराचे समकालीन असूनही मुस्लिमांविरोधात काही लिहिलं नाही, कदाचित त्यांची हिंमत झाली नाही, असा दावा त्यांनी केला.
इंद्रजित सरोज पुढे म्हणाले की, देशामध्ये करणी सेनेला खुली सूट मिळालेली आहे. करणी सेनेचे लोक समाजवादी पक्षाच्या नेत्यांना शिविगाळ करतात. मात्र त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला जात नाही. आमच्या समाजातील गरीब व्यक्ती स्वत:च्या मुलींना विकत आङे. त्यांच्याकडे लग्न करण्यासाठी पैसे नाहीत. भाजपा सरकारकडून त्यांना कुठलीही मदत केली जात नाही आहे, असा आरोप त्यांनी केला.