गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 11:51 AM2017-09-26T11:51:03+5:302017-09-26T11:53:13+5:30

चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हासनने गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे

If necessary, BJP will also take the 'lotus' - Kamal Haasan | गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन

गरज पडली तर भाजपाचं 'कमळ' देखील हाती घेईन - कमल हासन

Next
ठळक मुद्दे'लोकांचं भलं होणार असेल तर आपण कोणतीही सीमा गाठण्यासाठी तयार आहोत, मग भाजपाशी हातमिळवणी करायची असो किंवा चित्रपटसृष्टी सोडायची असो''राजकारणात जर लोकांचं भलं होणार असेल तर अस्पृश्य असं काही नसतं'जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन याआधी बोलले होते

चेन्नई - चित्रपटानंतर आता आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या अभिनेता कमल हासनने गरज पडली तर भाजपाशीही हातमिळवणी करण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे. लोकांचं भलं होणार असेल तर आपण कोणतीही सीमा गाठण्यासाठी तयार आहोत, मग भाजपाशी हातमिळवणी करायची असो किंवा चित्रपटसृष्टी सोडायची असो असं कमल हासन बोलले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तर देत आपल्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. 

भाजपासोबत जाण्यासंबंधी विचारलं असता कमल हासन यांनी सांगितलं की, 'जर माझ्या विचारांमध्ये अडथळा येणार नसेल, आणि प्रशासनाशी संबंधित असेल तर नक्कीच. कुठेतरी तुम्हाला राज्याच्या भल्याचा विचार करावा लागतो. त्यांना माझी विचारधारा योग्य वाटते की नाही हे मला माहित नाही. राजकारणात जर लोकांचं भलं होणार असेल तर अस्पृश्य असं काही नसतं'.

यावेळी तुम्ही राजकीय पक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यामागे कारण काय असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'गेल्या खूप दिवसांपासून हे डोक्यात होतं. हा मोठा निर्णय आहे. संताप हा त्यामधीलच एक भाग आहे. जर तुम्ही नक्षलवाद्याला विचारलंत तर संताप तर असतोच, पण त्यामागे एक विचारधाराही असते', असं उत्तर त्यांनी दिलं. 

तुम्ही डाव्या विचारांची बाजू घेऊनच वाटचाल करणार का ? असा प्रश्व विचारला असता नाही असं उत्तर त्यांनी दिलं. 'सामान्य लोक जास्त महत्वाचे असल्याने मला काही तडजोडी कराव्या लागतील. सामान्य लोकांची सेवा करण्याची माझी इच्छा आहे, पण अजून सुरुवात झालेली नाही', असं कमल हासन बोलले आहेत.

'जर राजकारणात मी महत्वाचं पद घेऊन उतरलो तर मला अभियन सोडावा लागेल. मी चित्रपटसृष्टीशी जोडलेला असेन मात्र मी दुस-या गोष्टींसाठी बांधिल असल्याने पुर्ण वेळ देऊ शकणार नाही'' असंही कमल हासन यांनी मान्य केलं. 

काही दिवसांपुर्वी कमल हासन यांनी निवडणुकीवर बोलताना राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्ट संकेत दिले होते. जर येणा-या 100 दिवसांत निवडणुका झाल्या तर आपण राजकारणात येऊ असं कमल हासन बोलले होते. कमल हासन बोलले होते की, कोणत्याही राजकीय पक्षाशी आपलं काही घेणं देणं नाही. आपण सर्व राजकीय पक्षांना मदत करण्यासाठी तयार असून, कोणासोबतही युती करणार नाही. 'मी त्यांच्यापैकी कोणासोबतही काम करण्यास जात नाही आहे. मी एकटाच पुढे जात राहीन', असं कमल हासन यांनी सांगितलं होतं. 

Web Title: If necessary, BJP will also take the 'lotus' - Kamal Haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.