"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:21 IST2025-09-25T15:20:52+5:302025-09-25T15:21:34+5:30
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये AIMIM ने पाच जागा जिंकून सर्वांना चकित केले होते, यामुळे राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते.

"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी सीमांचलमधून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली. भाजपची 'बी टीम' असल्याच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. याशिवाय, पुन्हा एनडीए आघाडी जिंकली, तर नितीश कुमार यांच्याऐवजी भाजपचा एखादा नेता मुख्यमंत्री होईल, असा दावाही त्यांनी केला. ते आज तकसोबत बोलत होते.
आपल्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आपण मुस्लीम मते कापण्यासाठी बिहारमध्ये आला आहात, असे बोलले जाते, असे विचारले असता, ते म्हणाले, हा केवळ आरोप आहे. लालू यादव यांच्या यांच्या घराबाहेर पक्षाचे कार्यकर्ते पोहोचल्यावरून ते म्हणाले, आपल्या घरी शुत्रू जरी आला तरी त्याला बसून बोलायला हवे. लालू यादव आणि तेजस्वी यादव यांना कशाची भीती वाटते, मला माहीत नाही. माझ्या मनात कसलीही भीती नाही. पूर्वीप्रमाणेच या निवडणुकीतही सीमांचलमध्ये जो पक्ष अेसल, त्याचा पराभव करू.
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचलमध्ये AIMIM ने पाच जागा जिंकून सर्वांना चकित केले होते, यामुळे राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा धक्का बसला होता. मात्र, नंतर त्यांचे चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते.
तत्पूर्वी, भाजपला मदत करत असल्याच्या आरोपांवर बोलताना बुधवारी ओवैसी म्हणाले होते, जर 'इंडिया' आघाडीने त्यांच्या पक्षाला सहा जागा दिल्या, तर ते आघाडीत सामील होतील. मुस्लीम बहुल असलेल्या किशनगंज जिल्ह्यातून त्यांनी आपल्या 'सीमांचल न्याय यात्रे'ला सुरुवात केली, यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते.