Opinion Poll 2022: आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा येणार भाजपा आणि एनडीएची सत्ता, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 22:34 IST2022-01-20T22:28:51+5:302022-01-20T22:34:27+5:30
National Opinion Poll 2022: आज देशात लोकसभेची निवडणूक झाली तर जनतेचा कल कसा असेल हे ओपिनियन पोलमधून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार आज देशात निवडणूक झाल्यास देशात मोदींची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे.

Opinion Poll 2022: आज लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा येणार भाजपा आणि एनडीएची सत्ता, पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पसंती
नवी दिल्ली - गेल्या सुमारे आठ वर्षांपासून देशात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात मागच्या काही काळापासून नाराजी वाढली आहे. शेतकरी आंदोलन, वाढती महागाई आणि बेरोजगारी, तसच कोरोनाचे संकट यामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेचा असंतोष दिसून आला आहे. अशा परिस्थितीत आज देशात लोकसभेची निवडणूक झाली तर जनतेचा कल कसा असेल हे ओपिनियन पोलमधून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार आज देशात निवडणूक झाल्यास देशात मोदींची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या या सर्व्हेमधून समोर आलेल्या जनमताच्या कलानुसार देशात आज निवडणूक झाल्यास देशात मोदी आणि भाजपाची सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे. या सर्व्हेमधील आकडेवारीनुसार ४०.७ टक्के मते मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळतीत. तर २६.७ टक्के मते ही काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मिळतील. तर इतरांच्या खात्यात तब्बल ३२.७ टक्के मते जाण्याची शक्यता आहे.
या मतांचे जागांमध्ये रूपांतर केल्यास या सर्व्हेनुसार भाजपा आणि एनडीएच्या खात्यात २९६ जागा जातील. म्हणजे पुन्हा एकदा देशात एनडीए बहुमतासह सत्तेमध्ये येऊ शकते. तर काँग्रेस आणि यूपीएला १२६ मिळतील. तसेच देशातील इतर पक्षांच्या खात्यात १२० जागा जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या देशातील राजकारणाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचाही लोकसभेचा कल जाणून घेण्यात आला आहे. त्यामध्ये आज लोकसभेची निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी ६७ जागा भाजपा जिंकेल. तर १० जागा सपाच्या खात्यात जातील. बसपाच्या खात्यामध्ये २ जागा जातील. तर काँग्रेसला एक जागा मिळेल.
तसेच देशाचे पंतप्रधान म्हणूनही बहुसंख्य लोकांनी नरेंद्र मोदी यांनाच पसंती दिली आहे. या सर्व्हेमधील ५३ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. तर केवळ ७ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली आहे. ६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ आणि ४ टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे.