प्रेरणादायी! घरची परिस्थिती बेताची, आई-बाबा करतात मजुरी, मित्रांकडून पैसे उधार घेऊन 'ती' झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:31 IST2022-10-13T13:24:53+5:302022-10-13T13:31:09+5:30
IAS Sreedhanya Suresh : श्रीधन्या सुरेशची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की तिच्याकडे यूपीएससीच्या मुलाखतीला जाण्यासाठीही पैसे नव्हते.

प्रेरणादायी! घरची परिस्थिती बेताची, आई-बाबा करतात मजुरी, मित्रांकडून पैसे उधार घेऊन 'ती' झाली IAS
ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत असेल तर सर्वच गोष्टी शक्य होतात. असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. लाखो तरुण यूपीएससीची तयारी करत आहेत. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे स्वप्न साकार करतात आणि परीक्षा उत्तीर्ण करतात. पण हा प्रवास प्रत्येकासाठी सोपा नाही. यासाठी अनेकांना खूप संघर्ष करावा लागला आहे. अशाच एक मुलीची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. IAS श्रीधन्या सुरेश हिने घवघवीत यश संपादन केलं आहे.
श्रीधन्या सुरेश ही मूळची केरळमधील वायनाड जिल्ह्यातील आहेत. हा परिसर अनेक बाबतीत मागे राहिलेला आहे. श्रीधन्याच्या कुटुंबात आई-वडील आणि तीन भावंडे आहेत. श्रीधन्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तिचे वडील रोजंदारी मजूर असून बाजारात माल विकायचे. त्याचबरोबर तिची आईही मनरेगा अंतर्गत काम करायची. श्रीधन्या सुरेशने तिचे शालेय शिक्षण राज्य सरकारी शाळेतून पूर्ण केले आहे.
शालेय शिक्षणानंतर तिने ट जोसेफ कॉलेजमधून जूलॉजीमध्ये पदवी घेऊन पुढील शिक्षण घेतले. यानंतर कालिकट विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणानंतर श्रीधन्याने लिपिक म्हणूनही काम केले. 2016 आणि 2017 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. मात्र, या दोन्हीत ती अपयशी ठरली. पण तिने हार मानली नाही. कठोर परिश्रम आणि जिद्द याच्या जोरावर तिने 2018 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 410 वा क्रमांक मिळवून आयएएस झाली.
श्रीधन्या सुरेशची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की तिच्याकडे यूपीएससीच्या मुलाखतीला जाण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र, हा प्रकार तिच्या मित्रांना कळताच त्यांनी श्रीधन्याला पैसे गोळा करून मदत केली. केरळमधील ती पहिली आदिवासी IAS आहेत. श्रीधन्याची गोष्ट संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. कितीही अडचणी आल्या तरी जिद्द आणि परिश्रमासमोर ते नेहमी हार मानतात असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"