KBC मध्ये जिंकले होते ५० लाख, आता जावं लागणार तुरुंगात, कारण काय? कोण आहेत महिला अधिकारी अमिता सिंह तोमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:10 IST2026-03-18T17:09:19+5:302026-03-18T17:10:44+5:30
Madhya Pradesh Crime News: एकेकाळी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५० लाख रुपये जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूरच्या तहसीलदार अमिता सिंह तोमर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

KBC मध्ये जिंकले होते ५० लाख, आता जावं लागणार तुरुंगात, कारण काय? कोण आहेत महिला अधिकारी अमिता सिंह तोमर
एकेकाळी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ५० लाख रुपये जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील विजयपूरच्या तहसीलदार अमिता सिंह तोमर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तसेच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पूर मदतनिधीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अमिता सिंह तोमर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लापला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असून, प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये श्योपूर जिल्ह्यात आलेल्या पुरानंतर पीडितांना दिलासा देण्यासाठी मदतीचं वितरण करण्यात आलं होतं. त्यावेळी बदौता तालुक्यात पदावक असलेल्या अमिता सिंह तोमर यांनी सुमारे २५ तलाठी आणि १०० हून अधिक दलालांसोबत मिळून १२७ बनावट खात्यांमधून सुमारे २.५७ कोटी रुपयांच्या रकमेचं वाटप केलं होतं. दरम्यान, ही अफरातफर उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या ऑडिटमधून उघडकीस आली. त्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासामध्ये ही मदत निधीची रक्कम वाटपादरम्यान, नातेवाईक आणि परिचितांना पूर पीडित असल्याचे दाखवून रक्कम त्यांच्या खात्यात वळवली, असा आरोप तपासानंतर करण्यात आला आहे. या घोटाळ्यामध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि दलालांमधील संगनमत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक लोकांना आरोपी बनवले आहे. त्यात अमिता सिंह तोमर यांच्यासह २५ तलाठ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी अमिता सिंह तोमर यांनी आधी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर तोमर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणे हाच एकमेव पर्याय तोमर यांच्यासमोर उरला आहे. अन्यथा पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अमिता सिंह तोमर ह्या २०११ साली कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या हंगामात ५० लाख रुपये जिंकून चर्चेत आल्या होत्या. मात्र गेल्या वर्षी सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे तसेच राज्यघटनेसंबंधीच्या एका पोस्टवर वादग्रस्त कमेंट केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखिल झाली होती.