इस्लामाबाद: भारतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करेन, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. सध्या भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं मोदी सरकारनं आमचा मैत्रीचा प्रस्ताव फेटाळला आहे, असं खान म्हणाले. रियाधमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट एनिशिएटिव्ह फोरममध्ये ते बोलत होते. पाकिस्तानला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं. 'आम्हाला भारत आणि अफगाणिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होईल आणि मानवी संसाधनांचा वापर विकासासाठी करता येईल,' असा इरादा त्यांनी बोलून दाखवला. पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतही चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. अफगाणिस्तानात शांतता असल्यास द्विपक्षीय संबंध सुधारतील. यामुळे व्यापार वाढेल. सोबतच मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होईल, असं इम्रान खान यांनी म्हटलं. मी पंतप्रधान होताच भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र भारतानं त्याला प्रतिसाद दिला नाही, असं म्हणत खान यांनी दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांचं खापर भारतावर फोडलं. इम्रान खान ऑगस्टमध्ये सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. भारतानं याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे भारतानं परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
...तेव्हा भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करेन- इम्रान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 07:48 IST