Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:30 IST2025-08-05T14:25:59+5:302025-08-05T14:30:10+5:30
Satyapal Malik Passes Away:जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
Satyapal Malik Death: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मंगळवारी दुपारी १ वाजता त्यांनी नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ११ मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांनी पदावर असतानाही उघडपणे सरकारचा जोरदार विरोध केला आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक पोस्ट करत मला सत्य सांगायचे असं म्हटलं होतं.
रुग्णालयात असताना सत्यपाल मलिक यांनी ७ जून रोजी एक्सवर पोस्ट केली होती. "मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. काल सकाळपासून मी ठीक होतो पण आज मला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जिवंत असलो किंवा नसलो तरी माझ्या देशवासियांना मला सत्य सांगायचे आहे," असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं.
"मी राज्यपाल पदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी राज्यपाल असताना शेतकरी आंदोलनही सुरू होते. कोणत्याही राजकीय लोभाशिवाय मी पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात जंतरमंतर ते इंडिया गेट पर्यंतच्या प्रत्येक लढतीत मी त्यांच्यासोबत होतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला आला होता, ज्याची चौकशी या सरकारने आजपर्यंत केलेली नाही. सरकार मला सीबीआयला धमकी देऊन खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी निमित्त शोधत होती. ज्या निविदेच्या प्रकरणामध्ये त्यांना मला अडकवायचे होतो ती मी स्वतः रद्द केली होती. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार झालाय. त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः निविदा रद्द केली. माझ्या पदावरुन हटवल्यानंतर या निविदेवर दुसऱ्याच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या," असंही सत्यपाल मलिक म्हणाले.
नमस्कार साथियों।
— Satyapal Malik (@SatyapalMalik6) June 7, 2025
मैं पिछले लगभग एक महीने के करीब से हस्पताल में भर्ती हूं और किड़नी की समस्या से जूझ रहा हूं।
परसों सुबह से मैं ठीक था लेकिन आज फिर से मुझे ICU में शिफ्ट करना पड़ा। मेरी हालत बहुत गंभीर होती जा रही है।
मैं रहूं या ना रहूं इसलिए अपने देशवासियों को सच्चाई बताना…
"मला सरकार आणि सरकारी संस्थांना सांगायचे आहे की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही. सरकारने माझी बदनामी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. मी सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना विनंती करतो की त्यांनी माझ्या देशातील लोकांना तपासादरम्यान काय आढळले ते जरा सांगावं. सत्य हे आहे की ५० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत उच्च पदांवर देशाची सेवा करण्याची संधी असूनही, मी अजूनही एका खोलीच्या घरात राहतो आणि कर्जातही बुडालो आहे. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते," अशी खदखद सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केली होती.