तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:09 IST2025-08-25T14:08:47+5:302025-08-25T14:09:51+5:30
Uttar Pradesh News: हल्लीच प्रदर्शित होऊन ५० वर्षे झालेल्या शोले या चित्रपटामध्ये वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं बसंती या प्रेयसीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या नाटकाचा सीन खूप गाजला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात घडली आहे.

तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
हल्लीच प्रदर्शित होऊन ५० वर्षे झालेल्या शोले या चित्रपटामध्ये वीरूचं पात्र साकारणाऱ्या धर्मेंद्रनं बसंती या प्रेयसीला मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या नाटकाचा सीन खूप गाजला होता. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यात घडली आहे. येथे पवन पांडे नावाचा तरुण प्रेयसीसाठी मोबाईलच्या टॉवरवच चढून धिंगाणा घालू लागला. खुशबू नावाच्या आपल्या प्रेयसीला इथे बोलावलं नाही तर टॉवरवरून उडी मारून जीव देईन अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र सर्व नाट्य आटोपून जेव्हा प्रेयसीचं सत्य समोर आलं तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
याबाबत सर्कल ऑफिसर अशोक कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पवन पांडे नावाचा हा प्रियकर शहरात एक पानाचं दुकान चालवतो. रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तो याकूबपूर येथील एका मोबाईलच्या टॉवरवर चढला. तिथून तो खुशबू नावाच्या त्याच्या प्रेयसीला हाका मारू लागला. ती जोपर्यंत समोज येत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, अशी धमकी तो तिथे जमलेल्या लोकांना देऊ लागला. एवढंच नाही तर ती आली नाही तर टॉवरवरून खाली उडी मारण्याची धमकीही त्याने दिली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क साधत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खुशबूला समोर आणण्याच्या मागणीवर ठाम होता. मात्र पोलिसांनी जेव्हा खुशबू नावाच्या महिलेचा शोध सुरू केला तेव्हा त्या परिसरात त्या नावाची कुठलीही महिलाच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या तरुणाला खाली उतरण्यासाठी पोलिसांना नवी क्लुप्ती लढवावी लागली.
त्यानंतर एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला खुशबू बनून पवनसोबत फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. पोलिसांची ही योजना यशस्वी ठरली. त्यानंतर सुमारे पाच तास रंगलेल्या नाट्यानंतर पवन नावाचा हा प्रियकर मोबाईल टॉवरवरून खाली उतरला. तो खाली उतरल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून पवन हा मागच्या दोन वर्षांपासून खुशबू नावाच्या एका तरुणीसोबत चॅट करत होता. तसेच त्या प्रोफाईलवर एका महिलेचा फोटो लावलेला होता, अशी धक्कादायक बाब समोर आली.
या अकाउंटवरून महिला बनून पवनसोबत बोलणाऱ्या व्यक्तीने प्रेमाचं आमिष दाखवून त्याच्याकडून पैसेही उकळले होते. मात्र खुशबू ही आपली खरी प्रेयसी असून, लोक आपल्याला तिच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्याला नेहमी वाटायचे. त्यामुळेच तो लग्नाचा हट्ट धरून मोबाईळ टॉवरवर चढला होता. मात्र अखेरीस हे संपूर्ण प्रकरण ऑनलाइन फसवणुकीचे असल्याचे समोर आले.