"मी कुणाच्याही विरोधात नाही, मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे"; राष्ट्रपतींच्या गावात मोदी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:22 IST2022-06-03T18:21:35+5:302022-06-03T18:22:50+5:30
Narendra Modi: मोदी म्हणाले, देश आणि लोकशाहीप्रती समर्पित असलेल्या पक्षांमध्ये आपल्याला एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे.

"मी कुणाच्याही विरोधात नाही, मला देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे"; राष्ट्रपतींच्या गावात मोदी म्हणाले...
कानपूर - मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, मला तर देशात एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी कानपूर देहात जिल्ह्यातील राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचे मुळ गाव असलेल्या परौंख येथे बोलत होते. यावेळी, विमानतळावर स्वागत केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले.
मोदी म्हणाले, देश आणि लोकशाहीप्रती समर्पित असलेल्या पक्षांमध्ये आपल्याला एक मजबूत विरोधी पक्ष हवा आहे. मी कुणाच्याही विरोधात नाही, माझे कुणाशीही वैयक्तीक मतभेद नाहीत. पण लोकशाही बळकट करण्यासाठी घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांनी यातून बाहेर पडायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात कानपूर देहातवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि परौंख गावावर आधारित एक डॉक्युमेंट्रीही दाखवण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे स्वागत केले.
राष्ट्रपतींचे वडिलोपार्जित घर 'मिलन केंद्र' त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक वापरासाठी दान करण्यात आले आहे. त्याचे नाव आता सामुदायिक केंद्र, असे करण्यात आले आहे. येथे बचत गटाचे काम करणाऱ्या महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.