राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 06:36 IST2025-07-20T06:35:46+5:302025-07-20T06:36:07+5:30
'तुम्ही महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, तुम्हाला पटकून पटकून मारू' असे आव्हान दुबे यांनी राज ठाकरेंना दिले होते.

राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले
मुंबई/ रांची : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदरमधील जाहीर सभेत भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यावर आता दुबे यांनीही उपहासात्मक टिपणी करीत ‘राज ठाकरेंना तर हिंदी मीच शिकवली’, अशा शब्दांत पुन्हा एकदा डिवचले आहे.
मुंबईत हिंदी भाषिक दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण झाली होती. त्यावर 'तुम्ही महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, तुम्हाला पटकून पटकून मारू' असे आव्हान दुबे यांनी ठाकरेंना दिले होते. राज यांनी दुबेंना ‘मुंबईत येऊन दाखवा, समुद्रात बुडवून मारू’ असा दम दिला होता. दुबे यांनी ज्या वाक्यात धमकी दिली. ती वाक्ये राज यांनी तशीच उच्चारल्याने ‘राज ठाकरेंना मीच हिंदी शिकवली’, असे दुबे म्हणाले.
सुप्रीम कोर्टात याचिका
राज ठाकरे यांच्याविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात ॲड. घनश्याम उपाध्याय यांनी जनहित याचिका दाखल केली. भाषा वादातून तणाव वाढविल्याने ठाकरे व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
ठाकरे ब्रँड चालत नाही!
ठाकरे ब्रँड जिवंत आहे, पण तो आता बाजारात चालत नाही. मतदारांना पसंत पडत नाही, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला.
राज यांच्यासोबत जाणार तो संपणार : मनोज तिवारी
जो राज ठाकरे यांच्यासोबत जाणार तो सुद्धा समाप्त होणार. मराठी संस्कृतीचे भाजप जेवढे पालन करतो तेवढे कुणीही करू शकत नाही, असे म्हणत भाजप नेते मनोज तिवारी यांनी राज यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.