मी नाही म्हणालो म्हणून मोदी मुख्यमंत्री बनले; तोगडियांचे मोठे गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 21:22 IST2019-05-11T21:21:31+5:302019-05-11T21:22:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नाही तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनातून उतरले.

मी नाही म्हणालो म्हणून मोदी मुख्यमंत्री बनले; तोगडियांचे मोठे गौप्यस्फोट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांचे एकेकाळचे जवळचे मित्र समजले जाणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले. गुजरातमध्ये सर्व आमदारांनी 2001 मध्ये मला मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी त्यांना हात जोडून नाही म्हटल्याचे तोगडीया यांनी सांगितले. तसेच त्यांनी मोदी यांच्यासोबतच्या मतभेदांवरही भाष्य केले.
एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींसोबतच्या वादावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना नाही तर 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मनातून उतरले. कारण त्यांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत. मोठमोठी आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाहीत. बेरोजगारी, नोटबंदी, सीबीआयसारख्या संस्थांवर बंधने लादून देशात अघोषित आणीबाणी लागू केली. यामुळे अयोध्येच्या मार्गावर एकत्र निघालेले मोदींनी लोकांना फसविल्याचा आरोप त्यांनी केला.
10 वर्षांचा असताना आपण हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. संघ, मोदी आणि मी तिघांनीही अयोध्येतील राम मंदिरासाठी आश्वासने दिली होती. मात्र, त्यांना राम केवळ निवडणुकीपुरताच दिसतो. शेतकरीही त्यांना निवडणुकीपुरताच हवा. ते त्यांच्या आईलाही रांगेत उभे करतात. साध्वी प्रज्ञा सिंहदेखील निवडणुकीपुरतीच आहे, असा आरोप त्यांनी केला.
साध्वी प्रज्ञासिंहने करकरेंविषयी केलेले वक्तव्य चुकीचे होते. जवळपास 60 हजार पोलिसांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यामुळेच आम्ही घरामध्ये सुरक्षित राहतो. मुली सुरक्षित फिरू शकतात. यामुळे साध्वीचे वक्तव्याची निंदा करतो, असे तोगडीया म्हणाले.